शहरातील अनेक उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. प्रभाग क्रमांक एकमध्येही रूपाईनगर, सावरकरनगर, सखारामनगर, गजानननगर येथे काही नागरिकांना कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेला असल्याचे आढळून आले आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे एकापासून दुसरा व्यक्ती संक्रमित होण्याची भीती प्रत्येक नागरिकाच्या मनात असल्याने असुरक्षिततेची भावना नागरिकांमध्ये निर्माण होत आहे. परिसर निर्जंतुकीकरण केला जावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर नगरसेविका ॲड. पूनम शिंदे- काकुस्ते यांनी पुढाकार घेत स्थानिक रहिवाशांना आश्वस्त करीत स्वतःची आणि कुटुंबातील सदस्यांची काळजी घेण्याचे आवाहन करीत स्वतः पुढाकार घेत स्वखर्चाने प्रभागातील रूपाईनगर, गजानननगर, सखारामनगर भाग एक आणि दोन, सावरकरनगर, दत्त कॉलनी, सुंदरनगर, काशीदरा रोड, महादेव मंदिर परिसर, विठ्ठल मंदिर परिसर आदी ठिकाणी निर्जंतुकीकरण फवारणी केली. तसेच प्रभागातील गजानननगर आणि सुंदरनगर यांना जोडणाऱ्या जोडरस्त्याची माती तसेच मुरूम यांचा भराव करीत दुरुस्ती केली. सदर नादुरुस्त रस्त्यामुळे नागरिकांना एक किलोमीटरचा वळसा घालून ये-जा करावी लागत होती. रस्ता दुरुस्ती झाल्यामुळे तसेच आपआपला परिसर निर्जंतुकीकरण होत असल्याचे पाहून नागरिकांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
साक्रीत परिसर केला निर्जंतुकीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:37 IST