धुळे : कोरोना विषाणूबाधित रुग्णांवर औषधोपचारासाठी आवश्यक रेमडेसिव्हर इंजेक्शनचा साठा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. मात्र, अशा प्रकारचा कोणताही साठा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा प्रशासनाने केलेला नाही. या इंजेक्शनच्या वितरणाबाबत अन्न व औषध प्रशासनाने निर्बंध निर्गमित केलेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटले आहे, कोरोना विषाणूबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातील अतिगंभीर रुग्णांना रेमडेसिव्हर इंजेक्शनची आवश्यकता भासते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये या औषधाचा पुरेसा साठा उपलब्ध होता. मात्र, आणीबाणीच्या परिस्थितीत त्यापैकी काही इंजेक्शन मानवतेच्या भावनेतून खासगी रुग्णालयांना उपलब्ध करून दिले होते. या औषधाचा पुरवठा उत्पादकांकडूनच होत नाही. त्यामुळे केवळ धुळे जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यभर ही परिस्थिती दिसून येत आहे. असे असले, तरी अन्य राज्यातून या औषधाचा साठा मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.
रेमडेसिव्हर इंजेक्शनचा गैरवापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. हे औषध गरजू रुग्णांना वेळेत उपलब्ध होईल याची खबरदारी गैरवापर आणि साठेबाजी करणाऱ्यांनी घेतली पाहिजे. कोरोना विषाणूचा प्रसार ही महामारी आहे. अशा परिस्थितीत कुणीही या औषधाचा गैरवापर अथवा साठेबाजी करू नये. मानवतेच्या भावनेतून या औषधाचा गरजू रुग्णांवर उपचारासाठी वापर होईल याचीही खबरदारी नागरिकांनी बाळगली पाहिजे.
तसेच जिल्हाधिकारी कार्यालय किंवा जिल्हा प्रशासनाकडे या औषधाचा साठा असल्याच्या अफवा आहेत. या अफवांवर नागरिकांनी, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी विश्वास ठेवू नये. या अफवा पसरविणाऱ्या नागरिकांचा पोलिस दलाच्या माध्यमातून शोध घेतला जात असून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी यादव यांनी म्हटले आहे.