काेरोनामुळे अगोदरच भीतीचे वातावरण आहे. त्यातच थाळनेर येथे सफाई कर्मचाऱ्यांअभावी अभावी गटारी तुंबून भरलेल्या आहेत; तर ग्रामीण रुग्णालयामागील वसाहत, पूरग्रस्त प्लॉट भागात रस्ते व गटारींची सोय नसल्याने सांडपाणी घराशेजारी, रस्त्यावर येत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पावसाचे दिवस जवळ आल्याने या दुर्गंधीमुळे नागरिकांना साथीचे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
थाळनेर गावात पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची डबकी मोठ्या प्रमाणात साचलेली असतात. गटारीही मोठ्या प्रमाणात तुंबल्या आहेत. त्यामुळे आता थाळनेर हे घाणीचे आगार झाल्याचे दिसून येत आहे. गावातील अनेक ठिकाणी मध्यवस्तीत उकिरडे असून गटारींमध्ये सांडपाणी साचलेले असल्याने परिसरात डासांचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत आहे. प्रशासनाने वेळीच या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांच्याकडे समस्यांची तक्रार लेखी व तोंडी करूनही दखल घेतली जात नसल्याने, महिलांनी एल्गार पुकारून ग्रामविकास अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.
गावातील तुंबलेल्या गटारींची साफसफाई व उकिरडे हटविण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.