शहरासह ग्रामीण भागातदेखील कोरोना साखळी तोडण्यासाठी अत्यावश्यक सेवा तसेच शेती व्यवसायासंबधी दुकाने सोडून सर्वच व्यवहार दिवसभर ठप्प होते. यामुळे मालपुरात एरवी गजबजलेल्या ठिकाणावर दुसऱ्या दिवशीदेखील शुकशुकाट पाहावयास मिळाला. यात डोक्यावर टोपले घेऊन विक्री करणारे विक्रेतेदेखील दृष्टीस पडले नसल्याचे दिवसभर चित्र होते. यावेळी लोकनियुक्त सरपंच मच्छिंद्र शिंदे, ग्रामविकास अधिकारी एल. सी. पाटील व ग्रामपंचायत सदस्य यांनी कडकडीत बंद पाळण्यासाठी नागरिकांना आवाहन केले.
मालपूर येथे मालपूरसह परिसरातील १३ गावे मिळून एकमेव सेन्ट्रल बँक ही राष्ट्रीयीकृत बँक आहे. मार्च एन्डिंग तसेच शेतकरी पीक कर्ज नवे जुने करण्यासाठी मोठय़ा संख्येने येथे उपस्थित राहात असतात. मात्र, बॅंकांचा दोन दिवसांचा संप असल्याने बँक बंद होती. परिणामी येथे शुकशुकाट होता.