धुळे : येथील जवाहर मेडिकल फाऊंडेशनच्या रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून, आता नाल्याला पूर आला तरी रुग्णालय प्रशासन किंवा आणि रुग्णांनी घाबरून जाऊ नये. अतिवृष्टीमुळे गेल्या वर्षी नाल्याला पूर आला होता. त्यात नाल्यावरील फरशी वाहून गेली होती. रुग्णालयाचा आणि हरण्यामाळ गावाचा धुळे शहराशी संपर्क तुटला होता. यावेळी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांचे प्रचंड हाल झाले. रुग्णवाहिकादेखील जाऊ शकत नव्हत्या. शेजारच्या शेतांमधून पर्यायी रस्ता तयार केला होता. यंदा तशी आपत्ती येऊ नये, यासाठी महानगरपालिकेने या नाल्यावर पुलाचे बांधकाम युध्दपातळीवर करण्यासाठी ३८ लाखांचा निधी मंजूर केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीत या पुलाचे बांधकाम झाले. गेल्या वर्षी १५ ऑगस्टला पालकमंत्र्यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन झाले होते. विहीत मुदतीत काम पूर्ण झाले आहे. पावसाळ्यानंतर रस्त्याचे आणि पुलाचे डांबरीकरणदेखील होणार आहे. आता नाल्याला पूर आला तरी चिता नाही, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
त्या पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्याने दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:35 IST