धुळे : निम्न पांझरा अक्कलपाडा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सोडावे अशी मागणी सुट्रेपाडा, आनंदखेडा, कुसूंबा, वार, सांजोरी, उडाणे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अक्कलपाडा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून गेल्या अडीच महिन्यांपासून पाणी सोडले आहे. त्याचा लाभ अक्कलपाडा, खंडलाय, शिरधाणे, कावठी, मेहेरगाव, नवलाणे, निमडाळे, गोंदूर तलावापर्यंत पाणी पाेहोचले आहे. परंतु सुट्रेपाडा, आनंदखेडे, कुसूंबा, वार या गावांपर्यंत पाणी पोहोचलेले नाही. पिकांचे नुकसान होत आहे. या गावांसाठी डाव्या कालव्याची पोटचारी आहे. परंतु पोटचारीला पाणी सोडलेले नाही. येथील शेती सिंचनाखाली येत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शिवाय जनावरांना चारा मिळणे देखील कठीण झाले आहे. पोटचारीतून पाणी सोडावे अशी मागणी आहे. निवेदनावर सुट्रेपाडा येथील भुराजी शिंदे, भिमराव पदमर, बापु मोरे, आनंदा मोरे, आधार देवरे, युवराज पाटील, रमेश पाटील, जगदिश पदमर, योगेश बागले यांच्यासह शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
तसेच अक्कलपाडा प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून गेल्या वर्षभरापासून पाणी सोडलेले नाही. त्यामुळे अक्कलपाडा, चिंचखेडे, देऊर, म्हसदी, लोणखेडी, चाैगाव, गोताणे, उडाणे, सांजोरी या गावांच्या क्षेत्रातील पिकांचे नुकसान होत आहे. पाण्याअभावी उत्तम प्रतिचे पीक घेऊ शकत नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. या निवेदनावर सांजोरी येथील दामु पाटील, वसंत पाटील, जगन्नाथ माळी, दाजभाऊ पाटील, मुरलीधर पाटील यांच्यासह इतर शेतकरी तसेच उडाणे येथील सरदार हाके, सुकदेव शिंदे, तुळशिराम मोरे, सोमा शिंदे, महादु मोरे, मोतिराम हालोर यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.