क्षयराेगाचा (टीबी) वाढता प्रादुर्भाव राेखण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध उपाययाेजना केल्या जात आहेत. क्षय रुग्णांवर याेग्य उपचार करता यावेत यासाठी खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी क्षयरुग्णांची नाेंद शासनाच्या निक्षय पाेर्टलवर केली पाहिजे, तसेच याविषयीची माहिती महापालिकेला कळवणे बंधनकारक आहे. महापालिकेच्या रुग्णालयात येणाऱ्या क्षयरुग्णांची नाेंद केली जाते. मात्र, सामाजिक दडपणामुळे अनेकदा रुग्ण आजार लपवण्यासाठी खासगी रुग्णालयात जातात. खासगी रुग्णालये, औषध विक्रेते, लॅबचालक क्षयरुग्णांची माहिती आरोग्य विभागाकडे कळवण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे शहरात किती क्षयरुग्ण आहेत, हे समजत नाही, तसेच त्यांना वैद्यकीय उपचार मिळतात का नाही, हे पाहणे कठीण होते. त्यामुळे कायदेशीर तरतुदींचे पालन ज्या प्रयाेगशाळा, डाॅक्टर्स, रुग्णालये, औषधे विक्रेते करणार नाहीत, त्यांना जबाबदार धरण्यात येईल, तसेच त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम २६९/२७० नुसार कारवाई करण्यात येईल. दाेषी ठरलेल्या व्यक्तीस किमान सहा महिने ते दाेन वर्षांपर्यंत शिक्षा व दंडाची तरतूद कायद्यात असल्याची माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
क्षयरुग्णांची माहिती मोबाइल ॲपवर नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:36 IST