धुळे : जिल्हयात रोहयोच्या थोडेथोडके नव्हे तर तब्बल ७०४ कामांमध्ये गैरव्यवहार झालेला आहे. तालुकानिहाय चौकशी झाल्यानंतरही आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कारवाई ऐवजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा संयुक्त चौकशीची शिफारस केलेली आहे. त्यामुळे चौकशींवर चौकशी सुरू असून, कारवाई होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत सिंचन विहीर,गायगोठा या योजना राबविण्यात येतात.जिल्ह्यात रोजगार हमी योजनेचे कामे करण्यात आली. त्यात देखील सिंचन विहीरीच्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले. जुन्याच विहीरींवर काम दाखवुन शासनाचा निधी बळकवण्यात आला.तसेच काही ठिकाणी एकाच विहीरीवर एका पेक्षा अधिक लाभार्थी दाखविण्यात आले. कामाचे कुशल देयके देखील अंदाजपत्रकातील बाबी व्यतरिक्त इतर बाबींसाठी खर्च करण्यात आले.धुळे तालुक्यातील देऊर येथे एक सिंचन विहीरीचे काम अडीच महिन्यात पुर्ण करण्यात आले.या कामावर अकुशल व कुशल असे दोन लाख ९९ हजार रुपयांचा खर्च दाखविण्यात आला.या कामाची पडताळणी नंतर सिंचन विहीर २०११ मध्ये अस्तित्वात होती.त्याच कामावर २०१८-१९ मध्ये खर्च दाखविण्यात आला.या कामात मोठी अनियमीतता व गैरव्यवहार सिध्द झाल्यामुळे रोहयोचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी जुलै महिन्यात मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले.या नुसार गटविकास अधिकाऱ्यांनी तालुका निहाय ऑक्टोबंर महिन्यात ७०४ कामांच्या चौकशीचा अहवाल सादर केला.जिल्हास्तरावर फेरपडताळणी करण्यात आली. ही प्रक्रीया वीस दिवस चालल्या नंतर फेरपडताळणीत देखील रोहयो अंतर्गत बोगस कामे झाल्याचे सिध्द झाले आहे.त्यात धुळे तालुक्यात अत्यंत गंभीर बाबी समोर आल्या आहेत.मात्र असे असतांना आता मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्तरावरुन कारवाई न करता चौकशीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करत पुन्हा संयुक्त चौकशीची शिफारस करण्यात आली आहे.दरम्यान जिल्हाधिकारी काय प्रतिसाद देतात. तसेच संयुक्त चौकशी समिती गठीत केल्यावर त्याचा निर्णय कधी लागणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
रोहयोच्या कामात झालेल्या गैरव्यवहारप्रकरणी संयुक्त चौकशीची जिल्हाधिकाऱ्यांकडे शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 12:26 IST