गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुदतबाह्य पूरक पोषण आहार (चिक्की वडी) ताब्यात घेऊन वाटपविना तशीच ठेवल्याने २ हजार बालके आहारापासून वंचित ठेवल्याचा व शासनाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा ठपका वरिष्ठांना पाठविलेल्या चौकशी अहवालात बालकल्याण अधिकारी व दहिवेल पर्यवेक्षिकावर ठेवण्यात आला आहे. गत काही दिवसांपासून या विषयांची चौकशीची मागणी सुरू होती. पंचायत समितीच्या बैठकीत हा विषय गाजला होता.
बालविकास प्रकल्प दहिवेल येथील अंगणवाडी क्र. पाच येथे प्रियदर्शनी महिला मंडळ पुणे यांच्याकडील चिक्की वडी पूरक पोषण आहार दि. २ जुलै, रोजी ताब्यात घेतला. उत्पादन दिनांक २० मे २१ असा असून या तारखेपासून दोन महिन्यांपर्यंत मुदत संपल्याचा कालावधी होता. दहिवेल बालविकास प्रकल्प अंतर्गत कमी वजनाची ३८६ बालके व मध्यम वजनाची १,६७४ अशी एकूण २,०५९ बालके असून या मुदतबाह्य पूरक पोषण आहार प्राप्त केल्याने वंचित राहिल्याचा ही ठपका ठेवण्यात आला आहे. पोषक चिक्की वडी या पूरक पोषण आहाराचे ६ हजार ६९ असे एकूण पाकिटे असून त्यांची किंमत ४ लाख ७६ हजार ३२७ इतकी आहे. मुदतबाह्य माल ७ ऑगस्ट २१ रोजी प्राप्त केल्याच्या वस्तू नमुना नं ३३ मध्ये स्वाक्षरी नमूद नोंद आहे.
१२ ऑगस्ट रोजी विस्तार अधिकारी एस.एस. भामरे, वरिष्ठ सहायक बी.पी. धाकड, जि.प. सदस्य खंडू कुवर, सामाजिक कार्यकर्ते गणेश गावित यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने संबंधितावर चौकशी अहवालात मुदतबाह्य मालसाठ्यास संबंधित पर्यवेक्षिका व बालविकास प्रकल्प अधिकारी दहिवेल हे जबाबदार असल्याचे समितीचे मत आहे.