शिरपूर तालुक्यातील चांदपुरी येथील रेशन दुकान क्रमांक ५० चे चालक मन्सूर आरीफ मेमन यांच्या विरुद्ध वेडू तुका भील व इतर सर्व राहणार चांदपुरी यांनी रेशनिंग मालासंदर्भात तक्रार केली होती़ त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२१ रोजी तहसीलदार आबा महाजन, एका कंपनीचे प्रतिनिधी भूषण जाधव, पुरवठा अव्वल कारकून भटेसिंग बोरसे यांनी भेट दिली़ मेमन यांच्या रास्तभाव दुकानातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना नियमित व प्रधानमंत्री गरीब कल्या योजना (मोफत) अंतर्गत दरमहा दोन्ही योजनांचे धान्याचे वितरण करणे आवश्यक असताना त्यांनी प्रत्येक महिन्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना नियमित व प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना या दोन्ही पैकी एकाच योजनेचे धान्य वितरित केल्याचे आढळून आले. तसेच लाभार्थ्यांना अनुज्ञेय धान्यापेक्षा कमी धान्य वितरित करीत असल्याचा जबाब तक्रारदारांचा नोंदविण्यात आला. तसेच शासनाने पुरविलेले पीओएस मशीनद्वारे केलेल्या ऑनलाईन वितरणाची तपासणी केली असता तपासणीमध्ये तफावत दिसून आली़
५ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचे धान्य पोच केल्यानंतर ते धान्य लाभार्थ्यांना त्वरित वितरण करणे अपेक्षित असताना ते वाटप केले नाही. त्यामुळे त्यांच्या दुकानात २७़ ६८ क्विंटल वजनाचा ५५ हजार ३५० रुपयांचा गहू, २६़ ८२ क्विंटल वजनाचा ८० हजार ४६० रुपयांचा तांदूळ तर ६६ किलो वजनाची १ हजार ९८० रुपयांची साखर असा एकूण १ लाख ३७ हजार ७९० रुपयांचा धान्याचा साठा जप्त करण्यात आला. रेशन दुकानदार मेमन यांनी ५ ते ३१ ऑगस्टदरम्यान रेशनिंगचा माल स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी काळाबाजार केल्याचे आढळून आले.
याबाबत पुरवठा निरीक्षण अधिकारी प्राजक्ता बाबाराव सोमलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रेशन दुकानदार मन्सुर मेमन याच्या विरोधात शिरपूर पोलिसात जीवनावश्यक वस्तू कायदा सन १९५५ चे कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख हे करीत आहेत.