धुळे : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत
पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. नागरिकांनी कोरोना विषाणूची लक्षणे दिसताच तपासणी करून घेत उपचार सुरू करावेत. त्यासाठी अंगणवाडी कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी आदींच्या माध्यमातून जनजागृती करावी. त्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने करावे, असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात शनिवारी दुपारी ‘कोविड- १९’ संसर्गाच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, वैद्यकीय महाविद्यालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, खासगी रुग्णालयांनी दरफलक लावले पाहिजेत. तेथे एक कर्मचारी नियुक्त करावा. अधिकाऱ्यांनी रुग्णालयास भेट देऊन पाहणी करावी. जास्तीचे बिल आकारल्यास बिलांची पडताळणी करावी. रेमडेसेविर औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. तसेच त्यांचा आवश्यकतेनुसार वापर करावा.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनची मदत घ्यावी. याशिवाय
लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.
जिल्हा रुग्णालयात जम्बाे कोविड सेंटर
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्हा रुग्णालयात जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येत असून ते २४ तास सुरू राहील. चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली असून पॉझिटिव्हिटी दर कमी होत आहे, असेही त्यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते डॉ. तुळशीराम गावित, हिलाल माळी, श्याम सनेर यांनी आपले म्हणणे मांडले.