दररोज शहरासह जिल्ह्यात लहान-मोठ्या स्वरूपाचे गुन्हे घडत असतात. त्याची पोलीस दप्तरी नोंद देखील होत असते. पोलिसांकडे गुन्हा दाखल झाल्यानंतर फिर्यादी, आरोपी, साक्षीदार ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यात येत असते. त्यानंतर प्रकरण न्यायालयात दाखल होते. त्यावर कामकाज होऊन गुन्ह्यात शिक्षेचे प्रमाण वाढण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू असतो, पण काहीवेळेस घटनेतील फिर्यादी अथवा साक्षीदार हे ऐनवेळी आपला जबाब फिरवून देत असल्याचे समोर येत आहे. तरी देखील आरोपीला शिक्षा लावण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू असतो.
गुन्हा सिद्धचे प्रमाण वाढतेय
वेगवेगळ्या गुन्ह्यांतील नाेंद ही पोलिसांच्या दप्तरी होत असते. घटना आणि गुन्ह्याच्या स्वरूपानुसार ते न्यायालयात सुनावणीसाठी पाठविले जात असते. साक्षीदार आणि आरोपी यांचे जबाब नोंदविण्याची प्रक्रिया पार पाडली जात असल्यामुळे गुन्ह्याच्या सिद्धचे प्रमाण हे घटलेले नसून त्याच्या प्रमाणात तशी वाढ झालेली आहे. गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार त्याचा निकाल देखील लागलेला आहे.
अपयशाचे खापर साक्षीदारांवर
घटना कोणत्याही स्वरूपाची असली तरी घटनेची पोलीस दप्तरी नोंद झाल्यानंतर साक्षीदाराला तसे महत्त्व असते. साक्षीदाराची साक्ष ही न्यायालयात महत्त्वाची मानली जाते. त्याच्या साक्षीवरच तसा निकाल अवलंबून असल्याचे सर्वश्रुत आहे, पण साक्षीदाराने ऐनवेळी आपली साक्ष फिरविल्यास त्याचा परिणाम हा निकालावर होत असल्याने अपयशाचे खापर हे साक्षीदारांवर फोडले जात आहे.
घटना घडल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती घेतली जाते. फिर्याद नोंदविल्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. सर्व आवश्यक ते पुरावे गोळा करून न्यायालयात पाठविले जाते. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी मिळेल यासाठी पोलिसांचा प्रयत्न असतो.
- चिन्मय पंडित, पोलीस अधीक्षक.