जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटाला सामाेरे जावे लागत आहे, अशा संकट काळात राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे धुळे शहराचे आमदार फारूक शाह यांनी केली.
जिल्ह्यात शासकीय नोंदींनुसार आतापर्यंत सुमारे ८० टक्के पेरण्या झालेल्या आहेत. परिणामी खरिपाच्या पहिल्या हंगामात केलेली पेरणी जिल्ह्यात संकटात सापडलेली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट नाकारता येत नाही. लॉकडाऊन काळात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज आहे. भाजीपाला व पिकांचे पडलेले भाव व भांडवलाची कमतरता अशा अनेक कारणांमुळे शेतकरी अडचणीत आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या या आशयाचे पत्र देऊन कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे आमदार फारूक शाह यांनी मागणी केली आहे.