धुळे : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येचा विचार केला तर जिल्ह्यात ४५ वर्षावरील नागरिकांची संख्या अंदाजे ७ लाखांच्या जवळपास आहे. त्यापैकी केवळ सव्वालाख नागरिकांचे लसीकरण झाले आहे. दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण तर अतिशय कमी आहे.
दरम्यान, पुढील आठवड्यात १ तारखेपासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू होणार आहे. या वयोगटाची लोकसंख्या अंदाजे १३ लाखाच्या जवळपास आहे. पहिल्या टप्प्याचे टार्गेट पूर्ण झाले नसताना आरोग्य विभागाकडून दुसरा टप्पा कितपत यशस्वी होईल याबद्दल शंका आहे. केवळ लसीकरण सुरू करून चालणार नाही तर लोकसंख्येच्या आकडेवारीनुसार लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून लसीकरणाचा वेग वाढवावा लागणार आहे. परंतु आरोग्य विभागाकडे नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. आकडेवारी मागविली असल्याचे जि. प. सीईओ वान्मथी सी यांनी सांगितले.
एका आठवड्याचा साठा
n जिल्ह्याचा लसीकरणाचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. सध्या आरोग्य यंत्रणेकडे केवळ आठवडाभर पुरेल इतकेच लसींचा साठा आहे. लसीकरण केंद्रांना दररोज लसींचा साठा पुरविला जातो.
n धुळे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसचा नेमका किती साठा शिल्लक आहे, याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली नाही. कोरोना आकडेवारीच्या बाबातीत आरोग्य विभाग उदासीन असल्याचे चित्र आहे.
४५ पेक्षा जास्त वयाचे २५ टक्केच लसीकरण
४५ पेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे २५ टक्क्यांपेक्षाही कमी लसीकरण झाले आहे.
दुसरा डोस केवळ ५ टक्क्यांपेक्षा कमी नागरिकांनी घेतला आहे. लसीकरणाचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे.
दुसऱ्या डोसचे काय?
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६४ हजार ७४९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ५० टक्केसुध्दा लसीकरण झालेले नाही.
त्यापैकी केवळ १ लाख ४४ हजार ३६८ नागरिकांनी पहिला डोस तर फक्त २० हजार ३७२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.
विशेष म्हणजे पहिला डोस घेतलेल्या तब्बल १ लाख २३ हजार ९९६ नागरिकांनी अजून दुसरा डोस घेतलेला नाही.
लसीकरणाच्या बाबतीत आरोग्य विभागासह प्रशासनाचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चित्र आहे.
ज्येष्ठही मागेच
n जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अडीच लाखापेक्षा अधिक आहे. त्यांचे लसीकरण सुरु आहे.
n प्रकृती अस्वास्थ्यामुळे तसेच इतर कारणांमुळे अनेक ज्येष्ठ नागरिक अजून लस घेण्यासाठी केंद्रापर्यंत पाेहोचलेले नाहीत. त्यांना घरपोच लस देण्याची गरज आहे.
लसीकरण केंद्रही वाढवावे लागणार
जिल्ह्यात १८ ते ४५ वयादरम्यानची लोकसंख्या १३ लाखाच्या आसपास आहे. ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. अजून ५० टक्के लसीकरणसुध्दा झालेले नाही. १ तारखेपासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यावर केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळणार आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढू शकतो. सध्या फक्त ८९ लसीकरण केंद्र कार्यान्वित आहेत. गर्दी नियंत्रित करण्यासाठी आरोग्य विभागाला लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी लागणार आहे.