धुळे : गोळीबार टेकडी परिसरात भरदिवसा चोरट्यांनी हातसफाई करीत पोलिसाचेच घर लक्ष केले़ सोने-चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला़ महिन्याभरात पोलिसाचे हे चौथे घर आहे़ शहरातील गोळीबार टेकडी लालबहादूर शास्त्रीनगर जवळील शर्मा नगरात प्लॉट नंबर २६ येथे संजय दादाभाई ठाकूर यांचे निवासस्थान आहे़ पोलीस अधीक्षक कार्यालयात लिपीक या पदावर ते कार्यरत आहेत़ देवपुरातील भगवती नगरात त्यांच्या जावयाचे निधन झाल्याने त्यांचा संपुर्ण परिवार तिथेच आहे़ गुरुवारी सकाळी काही कामानिमित्त त्यांचे घर उघडण्यात आले होते़ घर व्यवस्थित असल्याची खात्री करुन बंद करण्यात आले़ दुपारी या भागात शांतता असल्याने आणि बंद घराचा चोरट्यांनी फायदा उचलला़ घराला लावलेले कुलूप तोडून आतमध्ये चोरट्यांनी प्रवेश केला़ साहित्याचे नुकसान घरातील तीन कपाट फोडून सुमारे साडेतीन ते चार लाखांचे सोन्याचांदीचे दागिने लंपास केले़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर ठाकूर यांच्यासह शहर पोलीस आणि उपअधीक्षक सचिन हिरे यांनीही धाव घेतली़ श्वान पथकासह ठसे तज्ञांनाही पाचारण करण्यात आले़ शंकराच्या मंदिरापर्यंत श्वानाने माग दाखविला़ रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते़
भरदिवसा पोलीस कर्मचाºयाचे घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2019 23:11 IST