शहरातील रस्त्यांना
पथदिव्यांची प्रतीक्षा
धुळे : शहरातील अनेक रस्त्यांचे नूतनीकरण झाले आहे; परंतु या रस्त्यांना पथदिव्यांची प्रतीक्षा आहे. येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम झाल्याने रस्ता प्रशस्त झाला असला तरी पथदिवे नसल्याने अंधाराचे साम्राज्य कायम आहे. साक्री रोडवर देखील दुभाजक टाकले असले तरी अजूनपर्यंत पथदिवे लावलेले नाहीत.
किरकोळ विक्रेत्यांमुळे
वाहतुकीचा खोळंबा
धुळे : येथील मुख्य बाजारपेठेत हाॅकर्सची संख्या मोठी आहे. किरकोळ व्यावसायिक पोटापाण्याचा प्रश्न सोडवित असले तरी त्यांच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो हे नाकारता येणार नाही. हाॅकर्सला जागा देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असला तरी हा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. धुळे शहरात आग्रारोड, पाचकंदीलसह इतरही प्रमुख रस्त्यांची समस्या आहे.
महिलांसाठी रुग्णालय
सुरू करण्याची मागणी
धुळे : येथील साक्री रोडवरील मोगलाई भागात महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेसने केली आहे. मोगलाईमध्ये टीव्ही टाॅवरची जागा अनेक वर्षांपासून रिकामी पडली आहे. या सरकारी जागेत रुग्णालय सुरू होऊ शकते. मोगलाईत मागासवर्गीय गरीब कुटुंबांची संख्या सर्वाधिक आहे.
औद्योगिक वसाहतीत पुरेशा सुविधा द्या
धुळे : नरडाणा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी लघुउद्योग भारतीचे जिल्हाध्यक्ष राहुल कुलकर्णी, सचिव वर्धमान सिंगवी यांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे निवेदनाद्वारे केली आहे. नरडाणा औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगांची संख्या वाढत आहे; परंतु दळणवळणाच्या सुविधा अपुऱ्या पडत आहेत. नरडाणा एमआयडीसीमधील रस्त्यांची दुरुस्ती करावी, अवजड वाहनांसाठी रस्ते अधिक रुंद करावेत, मोठ्या वाहनांना वसाहतीमध्ये सहज प्रवेश करता येईल अशी व्यवस्था करावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
म्हसदी : बिबट्याच्या उपद्रवाला कंटाळलेल्या म्हसदीसह परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाकडे धाव घेतली आहे. म्हसदी, ककाणी, भडगाव, राजबाई, शेवाळी, काळगाव, विटाई, चिंचखेडे, बेहेड, वसमार, धमनार आदी गावांच्या परिसरात सध्या बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. पशुधन फस्त करणारा बिबट्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहे. वन विभागाने बिबट्यासह वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
किरकोळ विक्रेत्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा
धुळे : येथील मुख्य बाजारपेठेत हाॅकर्सची संख्या मोठी आहे. किरकोळ व्यावसायिक पोटापाण्याचा प्रश्न सोडवित असले तरी त्यांच्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो हे नाकारता येणार नाही. हाॅकर्सला जागा देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असला तरी हा प्रश्न अजूनही प्रलंबितच आहे. शिवाय खाऊगल्लीचे कामदेखील रखडले आहे.