धुळे जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न सुटावा व कृषीपंपांना अखंडित वीजपुरवठा व्हावा म्हणून प्रत्येक तुलक्यासाठी ५० असे एकूण दोनशे ट्रान्स्फार्मर घेण्याचा निर्णय मागील नियोजन समितीच्या बैठकीत झाला होता. असे असतानाही वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे त्यावर अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे प्रत्येक तालुक्यासाठी दिले जाणारे ५० ट्रान्सफार्मर तातडीने देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी नुकत्याच पालकमंत्री ना.अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत केली.
यावेळी धुळे जिल्ह्यासह तालुक्यातील शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या विजेच्या प्रश्नावर बोलाताना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले की, कृषीपंपाचे ट्रान्सफार्मर वारंवार नादुरस्त होत असतात. अशावेळी नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यास विलंब लागतो. परिणामी शेतकऱ्यांच्या पिकांचे पाण्याअभावी नुकसान होत असते. म्हणून मंजूर करण्यात आलेले ट्रान्सफार्मर तातडीने खरेदी करून शेतीला अखंडित वीजपुरवठा करण्यात यावा. या मागणीवर पालकमंत्र्यांनी विनाविलंब ट्रान्सफार्मर खरेदीचे आदेश दिले आहेत. तर धुळे जिल्ह्यातील विजेच्या संदर्भात प्रश्न सोडविण्यासाठी पुढील वर्षांसाठी ५ कोटींवरुन ८ कोटींचा निधी देण्याची मागणी आ. कुणाल पाटील यांनी केली. त्यानुसार हा निधी वाढवून ८ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान, धुळे तालुक्यात ठेकेदारांच्या नाकर्तेपणामुळे अनेक गावांत नवीन पोल बसिविणे, नवीन ट्रान्सफार्मर बसविणे, तारा टाकणे ही कामे रखडलेली आहेत. अशा नाकर्त्या ठेकेदारांवर कारवाई करुन थांबलेल्या कामांना चालना देण्याची मागणी आ. कुणाल पाटील यांनी केली.