दरवर्षी मार्च महिन्यांच्या शेवटीच कांदा लिलावास सुरुवात होते. मात्र, यावर्षी कांदा लिलाव सुरू होण्यास उशीर झाला. मंगळवारी जेबापूर रोडलगत असलेल्या पटांगणात कांदा लिलाव करण्यात आला. यावेळी १०५ वाहने दाखल झाली होती. सकाळी ११ वाजता कांदा लिलाव सुरू होऊन कांद्याला १३७५ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला, तर लहान कांद्याला ६०० ते ८०० प्रतिक्विंटल भाव मिळाला असून, सरासरी १००० ते ११०० रुपये प्रतिक्विंटल कांद्याला भाव मिळाला.
लिलाव झाल्यानंतर पाच हजार रुपये रोख व उर्वरित रक्कम ही त्या दिवसाचा धनादेश देण्यात येईल, तसेच दहा हजार रुपयांपर्यंत असलेली खरेदी अशा शेतकऱ्यांना रोख स्वरूपात रक्कम देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी आपला माल ज्या व्यापाऱ्यांना विक्री केला आहे अशा व्यापाऱ्यांकडून त्याच तारखेचा धनादेश घ्यावा. काही तक्रारी असल्यास त्या उपबाजार समितीस कळवावे, असे आवाहन करण्यात आले. यावेळी सचिव अशोक मोरे, शाखाप्रमुख भूषण बच्छाव, संजय बाबा यांच्यासह व्यापारी प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.