कोडीद येथील टाक्यापाणी गावात राहणारे नवलसिंग पोहऱ्या पावरा (वय ५१) यांच्या डोक्यात भायराम पावरा यांनी कुऱ्हाडीने वार केला होता. गेल्यावर्षी जून महिन्यात ही घटना घडली होती. त्यानंतर जखमी नवलसिंग यांच्या तक्रारीवरून सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. वैद्यकीय प्रमाणपत्र आल्यानंतर भायाराम विरोधात हल्ला केल्याबद्दल वाढीव कलमान्वये ९ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला. काही दिवसांनी नवलसिंग यांना किडनीला त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांचे डायलेसिस करण्यात आले. किडनीनंतर त्यांची नजर कमकुवत झाली.
२७ सप्टेंबर २०२० रोजी नवलसिंग यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा सचिन याने येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल केले होते. उपचार सुरू असताना या ठिकाणी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेबद्दल सांगवी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यू नोंदविण्यात आला़ शवविच्छेदनानंतर नवलसिंग यांचा व्हिसेराची प्रयोगशाळेत तपासणी झाली. तपासणीत नवलसिंग यांच्या मृत्यूचे कारण नमूद आहे. त्यामुळे मृत नवलसिंग यांच्या मृत्युपूर्व जबाबाचा आधार घेत खुनाचा गुन्हा दाखल झाला. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ तपास करीत आहे.