शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास वलवाडी येथील अनिल श्रीराम पाटील यांनी अंगातील पिवळा रंगाचा शर्ट, राखाडी रंगाची पँट, चप्पल, स्वत:चे आधारकार्ड तसेच एका चिठ्ठीवर वलवाडी व मूळगाव असलेले गणपूरचा पत्ता लिहिलेली चिठ्ठी ठेवून उडी मारल्याचे प्रथमदर्शनींनी सांगितले़ मात्र चिठ्ठीवर अन्य दुसरे काही मिळून आले नाही़ घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गिधाडे गावातील अनेकांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी केली़ तसेच काहींनी सदर कपडे, आधारकार्ड सोशल मीडियावर व्हायरल केल्यामुळे अनिल पाटील यांच्या आप्तजनांपर्यंत माहिती कळताच त्यांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली़
हतनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडे असल्यामुळे तापी नदी दुथडी भरून वाहत आहे़ त्यामुळे अनिल पाटील यांचा शोध घेणे कठीण झाले होते.
अनिल पाटील हे परिवारासह वलवाडी-धुळे येथे राहत होते. तर त्यांचे आई-वडील गणपूर-भवाळे, ता़ चोपडा, जि. जळगाव येथे राहतात़ घटनेची माहिती गणपूर येथेदेखील कळताच तेथील आप्तजनांनी गिधाडे तापी पुलावर गर्दी केली़ होती.
सावळदे तापी पुलापाठोपाठ आता गिधाडे पुलावरदेखील आत्महत्येचे प्रमाण वाढू लागले आहे़ गेल्या ३ दिवसांपूर्वीच कौटुंबिक वादावरून दाम्पत्यासह लेकराने तापी पुलावरून उडी मारली आहे़ अद्यापही त्या तिघांचा शोध लागलेला नाही़ आता ही घटना घडली असून या प्रौढाचाही शोध लागलेला नाही.