निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने नाव आणि फोटो टाकून कार्ड करुन घेण्याचे यापुर्वी वेळोवेळी जिल्हा आणि तालुका प्रशासनाकडून सूचित करण्यात आले आहे. लाेकसभा असो वा विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये १८ पेक्षा जास्त वय असणाऱ्या पुरुष अथवा महिलांना मतदार यादीत नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्या आधारे त्यांना मतदान करणे सुलभ होत असते. कालांतराने या प्रक्रियेत बदल झाला आणि मतदार कार्डावर संंबंधित व्यक्तीचे नावासोबतच त्यांची संपूर्ण माहिती फोटोसह येणे सुरु झाले. परिणामी मतदार कार्डावर नावासोबतच फोटो बंधनकारक करण्यात आला. यासाठी प्रशासनाने शहर आणि तालुका पातळीवर विशेष मोहीम राबवून मतदारांचे फोटो संकलाचे काम मार्गी लावले. कार्डावर ज्यांचे फोटो नाही त्यांनी फोटो प्रशासनाकडे आणून देण्याचे आवाहन देखील केले. तरी देखील धुळे शहरात ७ हजार ६०५, धुळे ग्रामीणमध्ये ४ हजार ४३१, साक्रीमध्ये ३ हजार ६७, शिंदखेड्यात ७ हजार ७४४ तर शिरपूरमध्ये ३ हजार ७२८ असे एकूण २६ हजार ५७५ इतक्या मतदारांचे फोटो येणे अपेक्षित आहे. त्याचे संकलन करण्याचे काम सुरु झाले आहे.
ज्या मतदारांचे फोटो हे कार्डावर आलेले नाहीत, त्यांनी आपले फोटो लवकरात लवकर प्रशासनाकडे सादर करणे आवश्यक आहे. तहसीलदार यांच्याकडे अथवा आपल्या भागातील बीएलओ यांच्याकडे फोटो द्यायला हवा. नव्या नियमाप्रमाणे मतदार यादीत आपला फोटो असायला हवा. प्रशासन संबंधितांचे फोटो संकलन करत आहेत. पण, मतदारांनी स्वत:हून फोटो आणून तो प्रशासनाकडे जमा केल्यास सोयीचे होईल.
- प्रमोद भामरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी