धुळे - कोरोना लसीकरणासाठी आवश्यक एडी सिरिंजचा (सुई) राज्यात सर्वत्र तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात सोमवार पर्यंत पुरतील इतक्या सिरिंज उपलब्ध आहेत. मात्र एडी सिरिंज उपलब्ध झाली नाही तर पर्यायी व्यवस्था म्हणून दुसरी सिरिंज वापरली जाणार आहे.
कोरोना लसीकरणासाठी एडी सिरींजचा वापर केला जातो. मात्र मागील काही दिवसांपासून राज्याला मिळणाऱ्या सिरिंजच्या संख्येत घट झाली आहे. त्यामुळे तुटवडा निर्माण झालेल्या जिल्ह्यांमध्ये २ सीसी व इतर सिरिंज वापरल्या जात आहेत. सध्या धुळे जिल्ह्यात पुरेशा सिरिंज उपलब्ध आहेत. मात्र सिरिंज उपलब्ध झाल्या नाहीत तर पर्यायी व्यवस्था म्हणून लहान बालकांच्या लसीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या ०. ५ मिली, १ मिली सिरिंज वापरण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने जिल्हा आरोग्य विभागाने आठवडाभरापासून प्रक्रिया सुरु केली असून तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
काय आहे एडी सिरिंज?
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी एडी सिरिंज वापरली जाते. कुपीतून ५ मिली द्रावण ओढल्यानंतर हि सिरिंज ऑटो लॉक होते. त्यामुळे एक कुपीतून ११ ते १२ डोस दिले जातात. एका डोस साठीच सिरींजचा वापर करतात.
२ सीसी सिरिंज कशी असते?
एडी सिरींजचा तुटवडा असलेल्या जिल्ह्यांमध्ये २ सीसी सिरिंज वापरात आहेत. लहान बालकांच्या नियमित लसीकरणासाठी या सिरींजचा वापर होतो. काहीशी जाड असणाऱ्या या सिरिंजमध्ये एक ते दीड मिली द्रावण वाया जाते.
३५ हजार सिरिंज शिल्लक
सध्या जिल्ह्यात ३५ हजार एडी सिरिंज शिल्लक आहेत. मात्र केंद्राकडून सिरींजचा पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे पुढील काळात पुरवठा न झाल्यास पर्यायी व्यवस्था आरोग्य विभागाने केली आहे. एडी सिरिंज उपलब्ध नसेल तर इतर सिरिंज वापरण्याबाबत मार्गदर्शक सूचना शासनाने केल्या आहेत.
वेस्टेज वाढण्याची शक्यता -
सिरिंज बदलली तर कोरोना लसीकरणाचे वेस्टेज डोस वाढण्याची शक्यता आहे. २ सीसी सिरिंज वापरत असलेल्या जिल्ह्यांमध्ये वेस्टेज डोसची संख्या वाढली आहे. एडी सिरिंज ऑटो लॉक होत असल्याने वाया जाणाऱ्या डोसचे प्रमाण कमी असते.
सध्या पुरेशा एडी सिरिंज उपलब्ध आहेत. पुढील काळात सिरिंज उपलब्ध झाल्या नाहीत तर पर्यायी व्यवस्था म्हणून ५ मिली सिरीज वापरणार आहोत. त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. या सिरिंज वापरण्याबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.
- डॉ. प्रसन्ना कुलकर्णी, जिल्हा लसीकरण अधिकारी