महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या बदलीचे आदेश बुधवारी सायंकाळी उशिराने निघाले. त्यांच्या जागेवर लातूरचे देविदास टेकाळे यांची नियुक्ती झाली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी नवीन आयुक्त टेकाळे यांनी पदभार स्विकारला. मावळते आयुक्त अजीज शेख यांनीही त्यांचे स्वागत केले.
पदभार स्विकारल्यानंतर आयुक्त टेकाळे यांनी सांगितले, धुळे शहराची मला फारशी माहिती नाही. प्रथम संपुर्ण शहराची माहिती घेतली जाईल. त्यानंतर कोणते प्रश्न आहेत ते समजून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. त्यानंतर अन्य कामांचे नियोजन केले जाईल. सध्याच्या काळात शहरात डेंग्यू, कोरोनाचा फैलाव होऊ नये,यासाठी उपाययोजना राबविण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
आयुक्त टेकाळे यांनी लातूर महापालिकेत आयुक्त म्हणून काम केले आहे. तसेच ते नाशिकला प्रशासकीय अधिकारी, कल्याण डोंबिवली, वसई विरार महापालिकेत सहायक आयुक्त, आयुक्त म्हणून काम पाहिलेले आहे. नालासोपारा, तळेगाव, संगमनेर, बीड येथील नगरपालिकेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. ते मुळचे बीड जिल्ह्यातील आहेत.