धुळे : भारतातील विविध शहरात कोरोनाने हाहाकार माजलेला आहे. सुदैवाने धुळे जिल्ह्यात कोरोनाबाधीत रूग्ण आढळलेला नाही. परिस्थिती नियंत्रणात असून कोरोनाशी लढण्यासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणा सज्ज असल्याचे भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे यांनी ‘लोकमत’ शी बोलतांना सांगितले़प्रश्न : आपत्कालीन परिस्थितीत किती रूग्णांवर उपचार होऊ शकतात?उत्तर : भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्हाधिकारी गंगाथरण डी़ यांच्या सुचनेनुसार ११ मार्च रोजी कोरोना रूग्णांसाठी ६ खाटांच्या विशेष दक्षता कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. व्हॅटीलेटर व इतर अत्यावश्यक सुविधा कक्षात उपलब्ध आहेत. तसेच १६ मार्च रोजी ३० खाटा असलेल्या विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानाचे रूग्णालयात रूपांतर करून तेथे ६० खाटा सर्व अत्यावश्यक सुविधांनी सज्ज आहेत.प्रश्न : किती वेळेत कोरोना संशयीतांचा अहवाल प्राप्त होईल?उत्तर : पुणे येथून अहवाल प्राप्त व्हायल एक ते दोन दिवस लागतात मात्र महाविद्यालयातच प्रयोगशाळा सुरू होत असल्याने दोन तासांत अहवाल प्राप्त होईल. धुळे, नाशिक, नंदुरबार, जळगाव आदि जिल्यातील कोरोना संशयीत रूग्णांचे नमुने तपासण्यात येणार आहेत.प्रश्न : किती डॉक्टर रूग्णांवर तपासणी व उपचार करीत आहेत?उत्तर : कोरोनाशी लढण्यासाठी नऊ डॉक्टरांचे पथक तयार करण्यात आले आहे. यात स्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ तसेच औषधे, मायक्रो बायोलॉजी, पथोलॉजी आदी विभागाच्या प्रमुखांचा समावेश आहे. तीन शिफ्टमध्ये प्रत्येकी पाच डॉक्टरांचे पथक रूग्णांची तपासणी करीत आहे.प्रश्न : डॉक्टर कशाप्रकारे स्वत:ची काळजी घेत आहेत?उत्तर : रूग्णांची तपासणी करीत असतांना डॉक्टर आवश्यक ती खबरदारी बाळगत आहेत. एन ९५ मास्क, गाऊन, शुकव्हर, ग्लोव्ज आदी वस्तुंचा वापर करूनच डॉक्टर रूग्णांची तपासणी करीत आहेत.प्रश्न : आरोग्याबाबत नागरिकांना काय आवाहन कराल?उत्तर : कोरोना विषाणू अत्यंत घातक स्वरूपाचा आहे़ त्यामुळे अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे़ विषाणूपासून आपला व आपल्या परिवाराचा बचाव करण्यासाठी नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडू नये. घरातच बसून कोरोनाला हरवता येऊ शकते. नागरिकांनी काळजी घ्यावी.
परिस्थिती हाताबाहेर निघण्यासापूर्वी दक्षता घेण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 22:14 IST