तालुक्यातील एका गावात राहणारी २४ वर्षीय विवाहिता ही आई व दोन वर्षांच्या मुलीसह राहते. या दरम्यान गोपाल सुरेश धनगर (वय २३) याच्याशी तिची दोन वर्षांपासून ओळख होती. गोपाल धनगर हा सात महिन्यांपूर्वी म्हणजे २५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पीडितेच्या घरात आला. त्याने तिचे तोंड दाबून जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर संशयिताने पीडितेला फोन करून घडलेल्या प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारीन अशी धमकी दिली. त्यामुळे पीडिता घाबरून गेली. मात्र यानंतरही त्याने तिला दोन-तीन वेळा जीवे मारण्याची धमकी देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे पीडिता गरोदर राहिली. हा प्रकार तिने गोपाल यास सांगितला असता, त्याने तिला स्वीकारण्यास नकार दिला.
दि. २० एप्रिल रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास तिला त्रास होऊ लागल्याने, नातेवाइकांनी तिला येथील इंदिरा गांधी हॉस्पिटल येथे दाखल केले. तेथे तिने एका बालिकेला जन्म दिला. त्यानंतर तिने घडलेला प्रकार नातेवाइकांना सांगितला.
पीडितेच्या फिर्यादीवरून शिरपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी गोपाल सुरेश धनगर याच्या विरोधात ३७६ (२) ,४५७, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, संशयित आरोपी गोपाल धनगर याचा विवाह २४ एप्रिल रोजी नियोजित होता. मात्र त्यापूर्वीच प्रेयसीची प्रसूती झाल्यामुळे २३ रोजी हळदीच्या दिवशीच तिने प्रियकराविरोधात शिरपूर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी नवरदेवाला हळद लागण्यापूर्वीच अटक केली.