लोकमत न्यूज नेटवर्कसाक्री : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आतापर्यंत तीन रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. कोरोनामुळे शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण असतांना नगरपंचायतीला गांभीर्य नाही. नगरपंचायत प्रशासनाने शहरवासीयांना वाऱ्यावर सोडून दिल्याचा आरोप भाजपने तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे.निवेदनात म्हटले आहे की, नगरपंचायत प्रशासनाने कोरोना काळात फवारणी यंत्र विकत घेतले आहे. त्यासाठी निधीचा खर्चही केला. परंतु या यंत्राचा उपयोग फवारणी करताना कुठेच दिसून आला नाही. जुने गाव परिसरात कोरोना रुग्ण अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. त्यामुळे पोळा चौक, राणा प्रताप चौक, वंजार गल्ली, चांद तारा मोहल्ला, कासार गल्ली, सुतार गल्ली, गवळीवाडा, बाजारपेठ, सराफ बाजार आदी परिसरांमध्ये अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. या परिसरात दररोज फवारणी करून परिसर निजंर्तुकीकरण करणे गरजेचे आहे. परंतु नगरपंचायत प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे जुने गाव परिसरासह शहरातील सर्वच कॉलनी परिसरात फवारणी करून निजंर्तुकीकरण करण्यात यावे. कंटेनमेंट क्षेत्र व व बफर झोन यातील नियमांची अंमलबजावणी करण्याचे काम नगरपंचायत प्रशासनाचे आहे. परंतु आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अधिकारी तथा तहसीलदार यांच्या आदेशाचे पालन करण्यात येत नाही. शहरात अस्वच्छतावाढली आहे.कोरोना काळात नागरिकांना पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नाही. जलशुद्धीकरण केंद्र नावालाच उरले आहे. शहरवासीयांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. प्रशासनाने दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला. निवेदन देतेवेळी भाजपचे तालुकाध्यक्ष वेडू सोनवणे, उत्पल नांद्रे, शैलेंद्र आजगे, कल्याण भोसले, योगेश भामरे, दयानंद मराठे, दिनेश नवरे,दीपक वाघ आदी उपस्थित होते.
कोरोनासंदर्भात नगरपंचायतीला गांभीर्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 12:46 IST