राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे राज्यात उद्भवलेल्या कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनुसूचित जमातीच्या कुटुंबीयांना साहाय्य करण्यासाठी खावटी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत सोमवारी बोराडी ता. शिरपूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, आमदार काशिराम पावरा, शिरपूर पंचायत समितीचे सभापती सत्तारसिंग पावरा, सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास विभागाच्या धुळे प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे, तहसीलदार आबा महाजन आदी उपस्थित होते.
मंत्री ॲड. पाडवी म्हणाले की, पावसाळ्यात रोजगाराअभावी आदिवासी कुटुंबीयांची उपासमार होऊ नये म्हणून खावटी कर्ज योजना सुरू करण्यात आली होती. ती आता खावटी अनुदान योजनेच्या रूपात पुनर्जीवित करण्यात आली आहे. ही योजना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित झाला होता. या कालावधीत आदिवासी कुटुंबीयांसमोर बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीत या कुटुंबीयांच्या मदतीसाठी खावटी योजना पुनर्जीवित करण्यात आली. सर्वेक्षण होऊन पात्र कुटुंबांची यादी तयार करण्यात आली. त्यानुसार खावटी अनुदान योजनेचे वाटप सुरू आहे. त्यात दोन हजार रुपये रोख, तर दोन हजार रुपये किमतीच्या वस्तूंचा समावेश आहे. प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत खावटी अनुदान योजना पोहोचविण्यात येईल. या योजनेचा ६० लाख नागरिकांना लाभ होणार आहे. आदिवासी समाजातील तरुणांना शाश्वत रोजगार निर्मितीसाठी आदिवासी विकास विभाग प्रयत्नशील आहे.
आदिवासी विकास विभागातर्फे बोराडीत सांस्कृतिक भवन साकारण्यात येईल. त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आदिवासी समाजातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे, ते स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पुढे जावेत म्हणून नर्सरीपासूनच इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचाच एक भाग म्हणून लौकी येथे एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल सुरू होईल. वसतिगृह, शासकीय आश्रमशाळांच्या इमारतींसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल. आदिवासी बांधवांच्या शिधापत्रिकांसाठी न्यूक्लिअस बजेटमधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी प्रकल्प कार्यालयाने पुरवठा विभागाकडे पाठपुरावा करावा, अशाही सूचना मंत्री ॲड. पाडवी यांनी दिल्या.
आदिवासी भागातील रिक्तपदांची तातडीने भरती प्रक्रिया राबवावी. वनहक्क जमिनीबाबतचे प्रश्न सोडवावेत. आदिवासी भागात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षणाच्या समस्या मार्गी लावाव्यात, अशी अपेक्षा आमदार काशिराम पावरा यांनी व्यक्त केली.
५८ हजार लाभार्थींच्या खात्यात खावटीची रक्कम जमा
प्रकल्प अधिकारी धोडमिसे यांनी सांगितले, खावटी अनुदान योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ५८ हजार २७६ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपये डीबीटीद्वारे जमा केले आहेत. उर्वरित लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे. शिरपूर तालुक्यातील २४ हजार ५१४ लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेतले. त्यापैकी २१ हजार ७३० अर्ज मान्य केले आहेत. १९ हजार ५२७ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन हजार रुपये जमा केले आहेत. २ हजार २०३ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग करण्याची कार्यवाही सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी रणजित पावरा, हारसिंग पावरा, श्यामकांत सनेर, दिलीप नाईक यांनी मनोगत व्यक्त केले. बोराडी परिसरातील आदिवासी बांधव उपस्थित होते.