दोंडाईचासह परिसरात कोरोना बाधित रुग्ण वाढत असल्याने
जिल्हा दंडाधिकारी दिलीप जगदाळे यांनी आठवडे बाजारावर बंदी आणली आहे. दोंडाईचात दर गुरुवारी भोगावती नदीत आठवडे बाजार भरतो. याच नदीत अनेक वर्षांपासून नियमित, दररोज बाजार भरतो. या बाजारात भाजीपाला, बांगडी विक्रेते, मच्छी विक्रेते, कटलरी बाजार भरतो. दररोजच्या बाजारात दोंडाईचा शहरातील छोटे विक्रेते असतात. तर गुरुवारच्या बाजारात दोंडाईचासह ग्रामीण भागातील विक्रेते दुकाने थाटतात.
आठवडे बाजार बंद केल्याच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर अपर तहसीलदार सुदाम महाजन व दोंडाईचा पालिका मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी आदेशाची अंमलबजावणी केली. आठवडे बाजारात येणाऱ्या विक्रेते व ग्राहकांविरोधात कडक कारवाईचा इशारा देण्यात आला होता. यामुळे दररोज भरणारा नियमित बाजार भरला. फक्त बाहेर गावातील विक्रेते आलेले दिसले नाही. दोंडाईचा शहरातील सुमारे ३०-३५ विक्रेते दिसून आले. तथापि आठवडे बाजारात येणाऱ्या जादा विक्रेत्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.