धुळे- शासननी ई पिक पाहणी नावनं याप तयार करेल शे. आते तुम्हना सातबारावर वर पिकेस्नी नोंद करासाठी तलाठी आप्पानी वाट दखानं काम नही. तुम्हीच आते मोबाईलवर ई पिक पाहणी हाई याप डाऊनलोड करा आणि तुम्हीच पिकनी नोंद करु शकतस. मन वावर मना सातबारा मीच नोंदसू मना पिकपेरा... अशा आपल्या गोड आणि रसाळ अहिराणी बोली भाषेत धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांनी ई पिक पहाणी या शासनाच्या मोबाईल अॅप्लिकेशनव्दारे पिकाची नोंद करण्यासाठी शेतकर्यांना आवाहन केले आहे. आ.पाटील यांनी आपल्या बोली भाषेत केलेल्या आवाहनामुळे शासनाची हा महत्वाकांक्षी उपक्रम ग्रामीण भागापर्यंत पोहचण्यास चांगलीच मदत होणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, शासनाच्या अनेक योजना ह्या शेतकरी आणि सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचतच नाहीत. काही योजना समजण्यास किचकट,कागदपत्रांमुळे हातळण्यास अडचणीच्या ठरत असतात.त्यामुळे संबंधित लाभार्थी शासनाच्या विविध योजनेपासून वंचित राहतो. महाराष्ट्र सरकारने शेतकरी व तलाठ्यांचा वेळ वाचावा आणि जास्तीत जास्त शेतक-यांना शासनाच्या योजनांचा लाभ व्हावा म्हणून ई पीक पाहणी हे मोबाईल ॲप्लिकेशन तयार केले आहे. या उपक्रमाचा १५ ऑगस्ट पासून शुभारंभ झाला आहे. ई पिक पहाणी ॲप्लिकेशनमुळे कृषी योजनांच्या लाभाबरोबरच चांगली बाजारपेठ, योग्य बाजारभाव याचाही फायदा होणार आहे. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणा-या या महत्वपूर्ण उपक्रमापासून आणि शासनाच्या योजनांपासून शेतकरी वंचित राहून नये म्हणून धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांनी खान्देशात प्रामुख्याने बोलली जाणा-या आहिराणी बोली भाषेतून ई पिक पहाणी या मोबाईल ॲप्लिकेशनव्दारे आपल्या पिकांची नोंदणी करण्यासाठी आवाहन केले आहे.