गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद असल्याने लहान मुले घरातच आहेत. याकाळात त्यांचे फिरणे व खेळणे बंद झाले आहे. यामुळे कोणताही शारीरिक व्यायाम झाला नसल्याने त्यांचे वजन वाढले आहे. यामुळे पालकही चिंताग्रस्त झाले आहेत. लहान मुले हे मोठ्यांचे अनुकरण करतात. पालकांनी देखील आपल्या जीवनशैलीत बदल करून व्यायाम केले पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच जंक फूड, तेलकट पदार्थ खाणे टाळणे गरजेचे आहे. व्यायामसोबतच खाण्यावरही बंधन घालणे आवश्यक असल्याचे बालरोगतज्ज्ञ सांगतात.
कारणे काय ?
१- शाळा सुरू असताना सायकल चालविल्याने मुलांचा व्यायाम व्हायचा. तर काहीजण पायी चालत जात असल्याने स्थूलता नव्हती.
२- कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने मुले पूर्णवेळ घरातच होती, त्यामुळे
शरीराची हालचाल कमी झाली. व चरबीचे प्रमाण वाढले आहे.
३- लहान मुलांना गोड व तेलकट पदार्थ अधिक आवडतात. मुले घरीच असल्याने या पदार्थांचे सेवन अधिक झाले त्यामुळे स्थूलता वाढली आहे.
तज्ज्ञ काय म्हणतात ?
कोरोनाच्या काळात मुले घरातच होती. खेळ खेळण्यावर मर्यादा आल्या त्यामुळे स्थूलता वाढली आहे. घरातच योगासने व हलका व्यायाम करणे शक्य आहे. गोड व तेलकट पदार्थ कमी प्रमाणात खावे. जेवण करताना टीव्ही पाहू नये.
- डॉ. तुषार कानडे, बालरोग तज्ज्ञ
शहरात स्थूलता ही नवी समस्या
शहरांमध्ये स्थूलतेचे प्रमाण वाढले आहे. लहान मुलांसोबतच मोठ्यांनाही वजन वाढीचा त्रास होतो आहे. लॉकडाऊनच्या काळात मॉर्निंग वॉक वरही निर्बंध आले होते. आता निर्बंध शिथिल झाल्याने सकाळी मैदानांवरही गर्दी होऊ लागली आहे. वजन कमी करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे.
पालकांचीही चिंता वाढली
कोरोनामुळे मुलांना बाहेर जाऊ द्यायला भीती वाटत होती. वर्षभरापासून ते घरातच आहेत. त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता त्यामुळे त्यांना खेळायलाही जाऊ दिले नव्हते. आता मात्र त्यांच्याकडून काही व्यायाम करून घेत आहे.
- तुषार भदाणे, पालक
शाळा बंद असल्याने मुले ऑनलाईन अभ्यास करत आहेत. ऑनलाईन अभ्यासामुळे अभ्यासाव्यतिरिक्त देखील मोबाईलवर गेम खेळण्याची सवय लागली आहे. तसेच मैदानी खेळ कमी झाले. आता त्यांना दररोज मैदानावर घेऊन जात आहे.
- प्रशांत पाटील, पालक
जिल्ह्यातील कुपोषित बालकांची आकडेवारी
कुपोषित ६३
तीव्र कुपोषित १२