धुळे : काेरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी तब्बल २१० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी ६३ कोटी रुपये जिल्हा नियोजनकडे पडून आहेत. या निधीतून महापालिकेचा दवाखाना आधुनिक यंत्र बसवून हायटेक करावे, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्यावतीने आयुक्त देविदास टेकाळे यांना देण्यात आले.
जिल्ह्यातील निष्क्रिय आरोग्य यंत्रणेच्या अनास्थेमुळे लाखाेंचा निधी पडून आहे. या निधीतून आरोग्य यंत्रणा मजबूत व बळकट करण्यासाठी मनपाची आधुनिक लॅब, डिजिटल एक्सरे मशीन, हायटेक सीटी स्कॅन व हायटेक एम. आर. आय. मशीनची मागणी करून मुंबईच्या धर्तीवर धुळे मनपाच्या मालकीचे दवाखाने सुसज्ज करावेत. त्यातून महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना मोफत किंवा अल्पदरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देता येतील. शहराच्या मध्यवर्ती व नागरिकांना सोयीचे होईल, असे मोठ मोठे दवाखाने असताना देखील चांगल्या सोयी सुविधा नाहीत. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास हिरे मेडिकल किंवा जवाहर मेडिकलमध्ये जावे लागते.
मुंबई मनपाने मोफत किंवा अल्पदरात जे जे हॉस्पिटल किंवा केईएमसारखे जागतिक दर्जाचे अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध असलेले हॉस्पिटल उभारले आहे. त्याच धर्तीवर धुळ्यात देखील विचार व्हावा. धुळे जिल्ह्याला लगत असलेला गुजरात आणि मध्य प्रदेश लागून असल्यामुळे बरेच रुग्ण उपचारासाठी धुळ्यात येतात. संपूर्ण देशाला जोडणारे महामार्ग धुळ्यातून असल्याने अपघाताचे प्रमाण देखील अधिक आहे. या सर्व भौगोलिक परिस्थितीचा विचार करून रुग्णांना मोफत किंवा अल्पदरात अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निर्णय घ्यावा, अशी मागणी संपर्कप्रमुख महेश मिस्तरी, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख मनोज मोरे, डॉ. सुशील महाजन, पुरुषोत्तम जाधव, संदीप चव्हाण, संजय जगताप, बाळू आगलावे, संजय वाल्हे, शेखर बडगुजर, योगेश चौधरी, देवा लोणारी, गुलाब सोनावणे, नीलेश मराठे यांनी केली.