धुळे : शहरात चोरी करणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. सुरत बायपास वरील पाचशे क्वॉर्टर जवळील राजदीप सोसायटीतील एका वकीलाचे बंद घराचे कुलूप बनावट चावीने उघडले. रोकडसह सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे दीड लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उजेडात आली. नागपूर-सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पाचशे क्वॉर्टरच्या बाजूला राजदीप सोसायटी असून त्यात प्लॉट नंबर ५६ मध्ये अॅड़ विनोद प्रभाकर सोनवणे यांचे वास्तव्य आहे. ते लग्नानिमित्त बाहेरगावी गेले असल्याची संधी साधून चोरट्यांनी बंद घर गाठले. कुलूप न तोडता बनावट चावीने घर उघडले. घरातील संसारोपयोगी साहित्य अस्ताव्यस्त केले. बेडरुममधील कपाटातील सर्व साहित्यांचे नुकसान करीत रोकडसह सोन्याचे दागिने असा सुमारे दीड लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरुन घेतला. चोरी केल्यानंतर पुढील दाराने न जाता पाठीमागून दाराने चोराने काढता पाय घेतला.सकाळी अॅड़ सोनवणे आपल्या घरी परतले. त्यावेळेस त्यांना आपले घर उघडे दिसून आले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त असल्याचे पाहून घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती धुळे तालुका पोलीस ठाण्यात कळविली. पोलीस देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यापाठोपाठ फॉरेन्सिक लॅबचे पथक आणि श्वान पथकानेही धाव घेतली. याठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचेही पथकाने भेट देवून पाहणी केली.
धुळ्यात वकीलाचे घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 21:56 IST