धुळे : बहुचर्चित असलेला मनमाड - धुळे - इंदूर रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर असून त्यासाठी आवश्यक असणाºया भूमि अधिग्रहणाच्या कामाला सुरुवात झाली आहे़ पंतप्रधानाच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन झाले असल्याने हा मार्ग निश्चित पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉ़ सुभाष भामरे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला़ डॉ़ भामरे म्हणाले, मनमाड - धुळे - इंदूर रेल्चे मार्ग झाला पाहीजे अशी गेल्या ४० वर्षापासूनची उत्तर महाराष्ट्रातील जनतेची मागणी होती़ २०१४ मध्ये मला खासदार म्हणून निवडून देण्यात आले़ त्यानंतर या मार्गाच्या पुर्णत्वासाठी माझे प्रयत्न सुरु झाले़ २०१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गाला मंजूरी मिळवली़ त्याची नोंद रेल्वेच्या पिंक बुकमध्ये झाली़ या कामासाठी निम्मे पैसे रेल्वे विभाग आणि निम्मे पैसे महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकार यांच्याकडून उभे केले जातील, असे ठरले़ तसेच मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरु केला, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला़ या मार्गाचे काम जेएनपीटीच्या माध्यमातून करावा असे मंत्री गडकरी यांनी सुचवले़ तसेच या मार्गासाठी असलेला डीपीआर देखील बनविण्यात आला़ कोणत्याही प्रकल्पाला वेळ लागतोच असे सांगत अन्य प्रकल्पापेक्षा मनमाड इंदूर रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने सुरु आहे़ हा प्रकल्प मार्गी लागेल, त्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असाही विश्वास व्यक्त करीत मालेगाव तालुक्यातील झोडगे आणि धुळे तालुक्यातील कापडणे येथे रेल्वे विभागाकडून जमिनीच्या नोंदी घेण्यात आलेल्या आहेत, असेही डॉ़ भामरे यांनी सांगितले़ याप्रसंगी महापौर चंद्रकांत सोनार, उपमहापौर कल्याणी अंपळकर, राजवर्धन कदमबांडे, अनूप अग्रवाल, हिरामण गवळी, रामकृष्ण खलाणे, प्रतिभा चौधरी आदी उपस्थित होते़
मनमाड-इंदूर रेल्वे मार्गासाठी भूमि अधिग्रहण सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 13:23 IST