धुळे - कोरोनामुळे वर्षभरापेक्षा अधिक काळ बससेवा बंद होती. त्यामुळे तिकीट काढण्याच्या अनेक ईटीआय मशीन नादुरुस्त झाल्या आहेत. जुन्या पद्धतीने तिकीट काढले जात असल्याने एसटीत पुन्हा खटखट ऐकायला मिळत आहे.
जिल्ह्यातील सर्वच आगाराच्या बस कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दीर्घकाळापासून बंद होत्या. तिकीट काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ईटीआय मशीनचा याकाळात वापर झाला नाही. आता त्या मशीन खराब झाल्या आहेत. त्यामुळे जुन्या पद्धतीने तिकीट काढले जात आहे. आता जुन्या पद्धतीने तिकीट काढण्याची सवय नसल्याने वाहकांना देखील अडचणी येत आहेत. तसेच एसटी महामंडळात मागील दोन ते तीन वर्षांपासून लागलेल्या वाहकांना या पद्धतीबाबत माहिती नाही. त्यांना केवळ ईटीआय मशीन वापरण्याची सवय असल्याने वेगळ्याच अडचणींचा सामना त्यांना करावा लागत आहे.
दुष्काळात तेरावा.. उत्पन्न घटले -
जिल्ह्यातील सर्वच आगाराचे उत्पन्न घटले आहे. सध्या ग्रामीण भागातील बस पूर्णपणे सुरु झालेल्या नाहीत तसेच प्रवाशांची संख्या कमी असल्याने उत्पन्न घटले आहे. डिझेल दरवाढीचा मोठा फटका एसटी आगाराला बसला आहे.
वाहकांना पुन्हा आकड्यांची जुळवाजुळव
मागील काही वर्षांपासून तिकीट काढण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मशीन वापरल्या जात आहेत. या मशीनमध्ये एका बटनावर रिपोर्ट मिळायचा. आता त्याच बंद पडल्याने किती तिकिटे गेली? त्याचे पैसे किती हा अहवाल करण्याचे काम वाहकांचे वाढले आहे. अनेकांना त्या कामाचा विसरही पडला आहे तर नवीन लागलेल्या वाहकांना त्याची माहिती नाही. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
पगार मिळतोय हेच नशीब
बससेवा सुरु झाली असली तरी ग्रामीण भागातील बस अजून सुरु झालेल्या नाहीत. लांब पल्ल्याच्या बस अधिक सुरु झाल्या आहेत. त्यामुळे टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांची ड्युटी लागत असून जितके दिवस ड्युटी तितक्याच दिवसांचा पगार दिला जातो. काही कर्मचाऱ्यांना अजूनही ड्यूटीची प्रतीक्षा आहे.
कोरोनामुळे बससेवा बंद होती. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मशीनचा वापर न झाल्याने काही मशीन खराब झाल्या आहेत. प्रवाशांची संख्या कमी असल्याने दररोज १० लाखांचा फटका बसत आहे. तसेच डिझेल दरवाढीचाही फटका बसला आहे.
- स्वाती पाटील, आगारप्रमुख धुळे
जिल्ह्यातील एकूण एसटी बस - ८८५
सध्या सुरु असलेल्या बस - ५४२
तिकिटे काढण्याच्या एकूण इलेक्ट्रॉनिक मशीन - ४५३
सध्या बंद असलेल्या इलेक्ट्रॉनिक मशीन - १३५
काय म्हणतेय आकडेवारी
धुळे
इलेक्ट्रॉनिक मशीन २३०
बिघाड ४०
ट्रे चा वापर १८
शिरपूर
इलेक्ट्रॉनिक मशीन ८०
बिघाड २५
ट्रे चा वापर १२
शिंदखेडा
इलेक्ट्रॉनिक मशीन ७८
बिघाड २३
ट्रे चा वापर१८
साक्री
इलेक्ट्रॉनिक मशीन ६५
बिघाड १९
ट्रे चा वापर १३