धुळे : मनपाच्या शिक्षण मंडळाकडून शहरातील बंद पडलेल्या बचत गटांना शालेय पोषण आहाराचे काम देण्यात येत आहे़ त्यामुळे अन्य बचत गटांवर अन्याय केला जातो़ सदरील बचत गटांची चौकशी करावी अशी मागणीचे निवेदन सहाय्यक आयुक्त शांताराम गोसावी यांना देण्यात आले़महापालिकेच्या शिक्षण मंडळाकडून शालेय पोषण आहाराचे काम देण्यात येते. परंतु गेल्या काही वर्षांपासून शिक्षण मंडळाने कोणतेही प्रकारचे निविदा प्रक्रिया किंवा अर्ज राबविली जात नाही, दहा ते बारा वर्षांपासून काही ठराविकच बचत गटांना पोषण आहाराचे काम देण्यात येत आहे. परंतु हे महिला बचत गट बंद आहेत का याची चौकशी शिक्षण विभागाकडून केली जात नाही़ शालेय पोषण आहाराच्या यादीत नाव नसणाऱ्या बचत गटांना देखील शिक्षण मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कामे दिली जातात़ अधिकारी व बचत गटांचा आर्थिक देवाण-घेवाण असल्याने अनेक वर्षापासुन हा प्रकार सुरू आहे़ सदरील प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनावर आश्विनी खरात, रत्ना चौधरी, रंजना चौधरी, सुषमा चौधरी, सुवर्णा खरात, सुनंदा मिस्तरी, भारती चौधरी, शुभांगी वाघ, कल्पना चौधरी उपस्थित होत्या.
मनपा शिक्षण विभागाचा बचत गटांवर अन्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 14:44 IST