गेल्या काही महिन्यांपासून कापडणेसह परिसरात कोरोना संसर्गजन्य आजारामुळे ग्रामस्थांना आर्थिकसह मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागले होते. मात्र, गेल्या एक-दीड महिन्यांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचा दिलासा मिळाला असताना कापडणे गावात मात्र आता डेंग्यू आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. गावातील बोरसे गल्लीतील एका चार वर्षीय बालकाला डेंग्यूची लागण झाली असून त्याच्यावर धुळ्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गावात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असताना प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ग्रामपंचायतीने अद्याप फवारणी केलेली नाही, ॲबेटींग केलेले नाही. हा आजार वाढू नये यासाठी प्राथमिक आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीने ताबडतोब उपाययोजना कराव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. यासंदर्भात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॅाक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.