जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी दुपारी तृतीयपंथीयांच्या समस्या, तक्रार निवारण जिल्हास्तरावर गठित समितीची आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डॉ. डी. यू. डोंगरे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महेश भडांगे, समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त हर्षदा बडगुजर यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, सन्मानाने जगणे हा तृतीयपंथीयांचा हक्क आहे. त्यांना सामाजिक सुरक्षा मिळवून देणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांची नोंदणी करतानाच त्यांच्या समस्या, अडचणींची माहिती करून घ्यावी. अशा व्यक्तींना पात्रतेनुसार स्वस्त धान्य, घरकुल योजनेचे लाभ मिळवून द्यावा. त्यासाठी शासकीय यंत्रणांनी संबंधितांकडे पाठपुरावा करावा. या घटकांची माहिती मिळविण्यासाठी सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्थांनी मदत करावी. अशा व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वेळोवेळी समुपदेशन करावे. त्यांना कौशल्य प्रशिक्षण, लहान-मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी वित्त पुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. जेणेकरून त्यांना शाश्वत रोजगार उपलब्ध होऊ शकेल. त्यासाठी कृती आराखडा तयार करून पुढील बैठकीत सादर करावा.
तृतीयपंथीयांना आरोग्याच्या सुविधा वेळोवेळी उपलब्ध करून द्याव्यात, त्याबरोबरच तृतीयपंथीयांच्या स्मशानभूमीसाठी महानगरपालिकेने प्रस्ताव सादर करावा, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. या चर्चेत मीना भोसले, शांताराम अहिरे, सचिन शेवतकर आदींनी भाग घेत विविध सूचना केल्या.