धुळे : सुलवाडे जामफळ कनोली उपसा सिंचन योजनेंतर्गत धुळे तालुक्यातील नऊ एमआय टॅंकचा समावेश केला आहे. यात प्रामुख्याने देवभाने, पुरमेपाडा, कुळ्थे, वेलाने, कुंडाणे, बाबरे (पिंपळे) या एमआय टॅंकचा समावेश आहे.
खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्या हस्ते येथील एमआय टॅंकचा शुभारंभ झाला. याप्रसंगी ज्येष्ठ नेते गजानन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, जि.प. माजी कृषी सभापती प्रा.अरविंद जाधव, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, आशुतोष पाटील, भाऊसाहेब भाऊसाहेब देसले, भैयासाहेब पाटील, रवींद्र राजपूत, आबा भालेक, जितेंद्र राजपूत, युवराज पाटील, शांताराम सूर्यवंशी आदी उपस्थित होते. धुळे तालुक्यातील जुने तीन एमआय टॅंक व नवीन सहा एमआय टॅंक असे एकूण नऊ एमआय टॅंक उभारले जाणार आहेत. त्या पाठोपाठ आता कुंडाणे, वेल्हाणे, बाबरे (पिंपळे) येथील एमआय टॅंकचे काम प्रगतिपथावर आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेसाठी सुमारे २,३६० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होतो. कोरोना महामारीत सगळी कामे बंद असताना, सदर सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेचे काम आजही प्रगतिपथावर आहे. त्याचाच एक भाग म्हणून कुंडाने वेल्हाणे, तसेच बाबरे पिंपळे येथील एमआय टॅंकचे काम ही प्रगतिपथावर आहे.
भविष्यात सुलवाडे जामफळ प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आल्यास धुळे तालुक्यातील ५० गावे लाभ क्षेत्रामध्ये येतील, तसेच जवळच्या पन्नास गावांतील शेती सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा सुटणार आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ.भामरे यांनी केले.