धुळे : टाटा ट्रस्टच्या सहकार्याने मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी आज्ञावली विकसित करण्यात आली आहे. ई-पीक पाहणी उपक्रमाची सोमवारपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील महसूल मंडल अधिकारी व कृषी मंडल अधिकाऱ्यांनी सर्वच गावांत यंदाच्या खरीप हंगामापासून ई-पीक पाहणीच्या जास्तीत जास्त कामाचे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.
शेतकऱ्याने नोंदविलेली त्याच्या शेतातील पिकांची माहिती तपासणे, आवश्यकतेनुसार दुरुस्ती करणे आणि नोंदणी केलेल्या पिकाच्या माहितीस मान्यता देण्यासाठी जमाबंदी आयुक्तांमार्फत तलाठ्यांसाठी मीडलवेअर ई-पीक ही आज्ञावली एनआयसीच्या माध्यमातून विकसित करण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पीक पाहणीची जलद, वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक पद्धतीने माहिती संकलित करण्यात येणार आहे. तलाठ्यांचे काम सोपे होण्यास मदत होणार आहे.
या ॲपच्या माध्यमातून अधिप्रमाणित रिअल टाईम डेटा उपलब्ध होणार आहे. मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे स्वत:च्या शेतातील उभ्या पिकांची माहिती, अक्षांश - रेखांश दर्शविणाऱ्या पिकांच्या छायाचित्रासह ही माहिती उपलब्ध होणार आहे. पिकांच्या नोंदणीबरोबरच जलस्रोतांची साधने, सिंचनाचा प्रकार, बांधावरची झाडे, पालेभाज्या, शेडनेट हाऊस, पॉलिहाऊस, विहीर पड, इमारत पड यासारख्या कायम पडची देखील नोंद करता येणार आहे.
पिकांची अद्ययावत आणि खरी माहिती नोंदविण्यासाठी शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातील उभ्या पिकाचा जीओ टॅग छायाचित्र काढावयाचे आहे. यामध्ये अक्षांश, रेखांश, दिनांक आणि वेळ नोंदविली गेली का, याची दक्षता घ्यावी. ई-पीक पाहणीच्या सनियंत्रणासाठी जिल्हा व तालुकास्तरावर समिती गठित करण्यात आली आहे. सर्व तलाठी व कृषी सहायकांनी गावपातळीवर कोतवाल, पोलीस पाटील, कृषी मित्र, मोबाईल दूत, धान्य दुकानदार, सेतू चालक, सामाजिक कार्यकर्ते, गावातील प्रमुख शेतकऱ्यांचा व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.