धुळे : शहरात धोकादायक इमारती दुर्लक्षित असल्याचे दिसून येत आहे. महापालिका प्रशासनाने आतापर्यंत धोकादायक इमारतींबाबत कुठलीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यास धोकादायक इमारती कोसळून जीवितहानीची शक्यता आहे.महापालिकेने दोनवर्षापुर्वी शहरातील धोकेदायक इमारतींचे सर्वेक्षण केले होते. त्यानुसार शहरात तब्बल १०५ धोकादायक इमारती असल्याचे समोर आले आहे. जुने धुळे, पेठ भाग व अन्य काही परिसरांमध्ये इंग्रजकालिन इमारती आहेत़ त्यापैकी बहुतांश इमारतींची बांधकामे १०० वर्षांपेक्षा अधिक जुनी झाली आहेत़ त्यापैकी बहुतांश धोकादायक इमारतींमध्ये नागरिकांचा रहिवास आहे. त्यामुळे पावसाळ्यात वादळी वारे व मुसळधार पाऊस झाल्यास धोकादायक इमारती कोसळल्यास वित्त व जीवितहानीदेखील होऊ शकते़ धोकादायक इमारतींना मनपाकडून दरवर्षी नोटिसा बजाविणे क्रमप्राप्त आहे. या नोटिसा मिळाल्यानंतर धोकादायक इमारतीच्या मालकाने त्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करून ते महापालिकेला सादर केले पाहिजे. त्यावर मनपाकडून पुढील कार्यवाही केली जाऊ शकते. परंतु एकाही इमारतधारकाने इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडीट करून अहवाल मनपाला सादर केलेला नाही.नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिका प्रशासनाकडून शहरातील जीर्ण इमारतींचा धोका लक्षात घेऊन कार्यवाही व उपाय-योजना करण्याची तत्काळ गरज आहे़
जीवघेण्या इमारतीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 21:31 IST