धुळे : शिरपूर तालुक्यातील अजंदे गावात घरफोडी झाली असून सोने-चांदीच्या दागिन्यांसह ६० हजार १०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
अजंदे गावात गणेशनगरमध्ये मच्छिंद्र नारायण सुतार (५६) यांच्या घरात शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमाराला ही घरफोडी झाली आहे. घर बंद असल्याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी
घराच्या मागील बाजूस असलेला लाकडी दरवाजाला छिद्र पाडून त्यातून हात घालून बेडरुमच्या दरवाजाला लावलेली कडी उघडली. लोखंडी राॅड बाजूला करून दरवाजा उघडला. घरात प्रवेश करून लाकडी कपाटाच्या लाॅकरमध्ये तसेच कपाटावर पत्र्याच्या पेटीत ठेवलेले दागिने आणि २५ हजार ६०० रुपयांची रोकड असा एकूण ६० हजार १०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मच्छिंद्र सुतार यांनी पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार थाळनेर पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी ५.४९ वाजता भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक शेख करीत आहेत.