भाईजीनगरामध्ये गाय मृत्युमुखी
मिल परिसरातील भाईजीनगर भागात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे विजेच्या तारेसह झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्या होत्या. या वीज तारांचा धक्का लागल्याने एक गाय मृत्युमुखी पडल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली. वीजतारा तुटल्याने रस्ताही बंद झाला हाेता. त्यामुळे मिल परिसर भागातील वीज पुरवठा सायंकाळी पाच वाजेनंतर सुरळीत झाला होता.
हजार खोली परिसर जलमय
शहरातील स्लॉटर हाऊसजवळील नाल्याला पूर आल्याने व घाणीमुळे पुराचे पाणी तुंबल्याने चाळीसगाव रोड परिसरातील हजार खोली ते गजानन कॉलनी, जनता सोसायटीतील शंभराहून अधिक घरांमध्ये मंगळवारी रात्री पाणी शिरले होते. त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. याबाबत प्रभाग बाराचे नगरसेवक अमीन पटेल, डॉ. सर्फराज अन्सारी, इस्लाम अन्सारी, रईस अन्सारी तसेच आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी चंद्रकांत जाधव, महेंद्र ठाकरे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
चितोड चौफुलीवरील रस्ता गेला वाहून
शहरातील चितोड चौफुली रस्त्याजवळील सर्व्हिस रोड वाहून गेला आहे. तसेच या परिसरातील चितोड सुरक्षा कॉलनीचा जुना रस्ताही पावसामुळे वाहून गेल्याने परिसरातील नागरिकांची मोठी अडचण झाली. नागरिकांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पर्यायी मार्गच नसल्याने नागरिक दिवसभर घरातच अडकून बसले होते. चितोड रोडवरील सर्व्हिस रोड वाहून गेल्याने तसेच पावसाचे पाणी वाहत असल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या मार्गाने होणारी वाहतूक शहरातील शिवतीर्था पासून साक्री रोडने वळविण्यात आली होती.