सुनील बैसाणे
धुळे : भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये तेलाचे महत्त्व खूप जास्त आहे. तेलामुळे जेवण स्वादिष्ट बनते. परंतु याच तेलाचा पुनर्वापर केला, तर ते आरोग्यासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे कॅन्सर देखील होण्याचा धोका आहे.
तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरे पदार्थ बनविले, तर अशा तेलात फ्री रॅडिकल्स तयार होतात. हे रॅडिकल्स शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. अनेकदा यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. एकदा वापरलेले तेले पुन्हा-पुन्हा वापरल्याने ॲथोरोस्कलाॅरोसिस होऊ शकतो, ज्यामुळे आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढून धमन्या ब्लाॅक होतात, असे तज्ज्ञ सांगतात.
सध्या रस्त्यावरच्या हातगाड्यांवर डीप फ्राय केलेले मांसाहारी पदार्थ खाणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या हातगाड्यांच्या कढईमधील तेच ते तेल वारंवार वापरले जाते.
तेलाचा पुनर्वापर ठरू शकतो घातक
एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरल्यास ॲसिडिटी तसेच हृदयासंबंधित आजार, अल्झायमर, पार्किन्सनचे आजार आणि घशाची जळजळ यांसारखे विकार जडू शकतात. त्यामुळे घरात खाद्यपदार्थ तळताना तेलाचा पुनर्वापर होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच बाहेर खातानाही खाद्यपदार्थांची खात्री करून घ्यावी.
रस्त्यावर न खाल्लेलेच बरे
शहरासह जिल्ह्यात रस्त्यांच्या दुतर्फा जंकफूड विक्रीच्या हातगाड्या सुरू आहेत.
कचोरी, समोसे, पाववडा, बटाटेवडा असे खाद्यपदार्थ खाण्याकडे अनेकांचा कल असतो.
या हातगाड्यांवर कढईतील तेलाचा वारंवार वापर होतो. त्यामुळे बाहेर न खाल्लेलेच बरे.
...तर होईल दंडात्मक कारवाई
वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या विशिष्ट यंत्राद्वारे खाद्यतेलांची तपासणी करण्याची मोहीम महिनाभर राबवली होती. जवळपास १० ते १२ तपासण्या केल्या होत्या. परंतु त्यात भेसळ किंवा तेल वापरायोग्य नसल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे कारवाई झाली नाही. एफडीएकडे नोंदणीकृत व्यावसायिकांनी तेलाचा पुनर्वापर केल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. व्यावसायिकांनी दक्षता घ्यावी.
- संतोष कांबळे, सहा आयुक्त, अन्न प्रशासन
डाॅक्टरांचा सल्ला...
पुनर्वापर केलेल्या तेलाचे सेवन केले, तर हृदयरोगाला आमंत्रण मिळते. घसा खवखवतो, ॲसिडिटी वाढते. तसेच कर्करोगासारखे गंभीर आजारही होऊ शकतात. त्यामुळे अशा तेलापासून बनविलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे. आहाराच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे.
- डाॅ. नितीन पाटील, तज्ज्ञ
तेलाचा पुनर्वापर केल्याने किंवा कमी दर्जाचे तेल वापरलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते. चरबीचे प्रमाण वाढून वजनही वाढते. त्यामुळे आरोग्यविषयक अनेक समस्या निर्माण होतात. निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे.
- डाॅ. धवल कलाल, आहारतज्ज्ञ
अहो आश्चर्यम्, एकावरही कारवाई नाही!
धुळे शहरासह जिल्ह्यात रस्त्यावरच्या विविध हाॅटेल्समध्ये विशेष करून नाॅनव्हेज फ्राय करून देणाऱ्या गाड्यांवर तेलाचा सर्रासपणे पुनर्वापर होतो.
परंतु शहरात किंवा जिल्ह्यात केवळ तपासणी झाली आहे. एकही कारवाई झाली नसल्याचे अन्न प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.