याअगोदर येथील मोठे महादेव मंदिर परिसरात रुग्ण आढळून आले होते, तर आता प्राथमिक आरोग्य केंद्र हाकेच्या अंतरावर असलेल्या रावल नगरात डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी आता डास निर्मूलन मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. गावात कोरोना नियमांची अंमलबजावणी होत नसून जणू येथून कोरोना हद्दपार झाला अशा अविर्भावात सर्वच दिसून येतात. कोरोनाच्या संकटातून ग्रामस्थ सावरत नाहीत तोच डेंग्यूने दुसऱ्यांदा आक्रमण केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. डेंग्यूचा अधिक फैलाव होऊ नये म्हणून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा डेंग्यूचे थैमान उभे राहून आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखी ग्रामस्थांची गत होणार आहे.
मालपूर येथील रावल नगर भागात लहान मुलीला डेंग्यूची लागण झाली. एका खासगी रुग्णालयात उपचार करून या बालिकेला घरी पाठविण्यात आल्याचे समजते. डॉक्टरांनी या मुलीची तपासणी केली असता डेंग्यूसदृश परिस्थिती दिसून आली. यामुळे रक्त-लघवीचे विविध नमुने घेऊन तपासणी केली असता आलेल्या तपासणी अहवालावरून डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यामुळे सध्या या परिसरात भीतीचे वातावरण आहे. आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना योजून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मालपूर गावात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता मोहीम हाती घेऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शुद्ध पाणीपुरवठा, गावातील सर्वच गटारी वाहत्या कशा असतील याची काळजी घ्यावी. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळण्याचे नियोजन झाले पाहिजे. सध्या गावात घंटागाडी फिरत असल्यामुळे घनकचरा आटोक्यात आलेला आहे. याआधीचा कचरा ठिकठिकाणी तसाच पडून असल्याने त्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. पाण्यात टीसीएलचे योग्य प्रमाण आहे का नाही, हेदेखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी तपासणी करून खातरजमा करावी. यामुळे कोणत्याही साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवणे सहज शक्य होणार आहे. येथील जलकुंभ ओव्हरफ्लो होण्याचा प्रकार नित्याचा झाला आहे. यासाठी योग्य काळजी घेतली जावी.
यासंदर्भात गावातील आरोग्य विभाग अनभिज्ञ असून त्वरित शोधमोहीम हाती घेऊन डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्यास त्यांना संदर्भित करणे आवश्यक आहे. डेंग्यूूचा डास स्वच्छ पाण्यावर आढळून येत असल्यामुळे पाण्याने भरलेली टाकी, ड्रम वेळोवेळी स्वच्छ करून ग्रामस्थांनीही आरोग्याची काळजी या काळात घेतली पाहिजे, गरज नसेल तर विनाकारण पाण्याचा साठा करू नये.
सार्वजनिक ठिकाणावरील डबक्यात ऑईल टाकून निर्जंतुकीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य विभागाने दखल घ्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. येथे सध्या तीन डॉक्टर असल्याचे समजते. मात्र मुख्यालयी एकही राहात नाही. पावसाळ्याचे दिवस असून सर्दी, खोकला व व्हायरल रुग्णांच्या खासगी दवाखान्यात रांगा लागल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र मात्र ओस दिसून येते. येथे फक्त लसीकरणाची गर्दी दिसून येते.
मालपूर येथील बाबासाहेब घाटावरून अमरावती नदीपात्रात प्रातर्विधीसाठी या परिसरातील नागरिक जातात. त्यांना चालायला येथील अस्वच्छतेमुळे मार्ग नाही, तर रात्रीच्या वेळी अंधार असतो. अनेकदा ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन कैफियत मांडली. मात्र उपयोग झाला नाही. शेवटी स्वखर्चाने येथील नागरिकांनी सोय केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.