धुळे : कोरोना झालेल्या रुग्णांना बरे झाल्यानंतरही विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आता कोरोनामुक्त झालेल्या काही रुग्णांना केसगळतीचीही समस्या सतावते आहे.
कोरोनातून बरे झाल्यानंतर पोस्ट कोविड गुंतागुंतीपासून बचावण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. केस गळतीसह इतरही व्याधी रुग्णांना सतावत आहेत. यापासून वाचण्यासाठी पुरेशी झोप, सकस आहार व तणावमुक्त राहणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
कोविडनंतर दोन ते तीन महिन्यांनी गळू लागतात केस
कोरोनामुक्त झालेल्या काही नागरिकांना केस गळतीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. काही जणांचे दीड महिन्यानंतर केस गळायला सुरुवात तर काहींचे दोन ते तीन महिन्यांनी केस गळत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यात महिलांची संख्या लक्षणीय आहे.
हे करा -
- मानसिक व शारीरिक ताण तसेच औषधांच्या अतिवापराने केस गळतीची समस्या सतावत आहे.
- तणावमुक्त राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे असल्याचे डॉ. अभिजित शिंदे यांनी सांगितले.
- आहारावर लक्ष देणे गरजेचे आहे. जीवनसत्त्वयुक्त आहार घ्यावा. दुग्धजन्य पदार्थ व हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असावा.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू करावे.
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानंतरच करा घरगुती उपाय
- कोरोना झाल्यानंतर सकस आहार घ्यावा. हिरव्या पालेभाज्या व जीवनसत्त्वयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. आहारात फळांचा समावेश करावा.
- केस कशामुळे गळत आहेत याची कारणमीमांसा करणे आवश्यक आहे. रक्त कमी असेल व त्यामुळे केस गळत असतील तर गूळ व शेंगदाण्याचे सेवन करावे. तसेच पेंडखजूर, शेंगदाण्याचे लाडू आदी पदार्थांचे सेवन करावे.
-
ज्या रुग्णांना कोरोनाची तीव्र लक्षणे होती त्यांच्यात केसगळतीची प्रमाण अधिक आहे. महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे. सकस आहार व तणावमुक्त जीवनशैली बाळगणे आवश्यक आहे. घरगुती उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. राहुल शिंदे, त्वचारोगतज्ज्ञ