धुळे : जागतिकीकरणामुळे सर्व जग एक बाजारपेठ झाले आहे. शासनाचे विविध विभाग आणि निर्यातदारांच्या सहकार्याने धुळे जिल्हा निर्यातीत चांगली कामगिरी करू शकतो. त्यांनी ही संधी साधत जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना द्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज सकाळी केंद्र सरकारचा वाणिज्य विभाग, राज्य शासनाचा उद्योग विभाग, विदेश व्यापार महानिदेशालय, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि जिल्ह्यातील निर्यातदार व औद्योगिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक्स्पोर्ट कॉन्क्लेव्ह’चे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उपेंद्र सांगळे, उपसंचालक अमोल इंगळे, सहायक आयुक्त के.डी. भामरे, निर्यात सल्लागार दिनेश देवरे, अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक मनोजकुमार दास, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चौधरी, सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मुख्य व्यवस्थापक गोपाल सक्सेना, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एमआयडीसी अवधान शाखेचे व्यवस्थापक जोशी, विदेश व्यापार महानिदेशालय, मुंबईचे एफटीडीओ संजय धुपेस्कर, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग आदींची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते उद्योग प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, जिल्हा निर्यातीत उत्कृष्ट कामगिरी बजावू शकतो. या पार्श्वभूमीवर निर्यातदार, उद्योजकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी, सूचना प्रशासनास कळवाव्यात. त्यांचा जिल्ह्याच्या कृती आराखड्यात समावेश करण्यात येईल, तसेच निर्यातदार, औद्योगिक संघटनांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले. महाव्यवस्थापक सांगळे यांनी जिल्ह्याच्या निर्यात कृती आराखड्याबाबत माहिती दिली. त्यासाठी निर्यातदार व औद्योगिक संघटनांनी सूचना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले. सहायक आयुक्त भामरे यांनी केंद्र, वस्तू व सेवाकर कायदा, केंद्रीय उत्पादन शुल्क करविषयक शासनाच्या योजना व सवलतींबाबत मार्गदर्शन केले. देवरे यांनी निर्यातीसाठीचे विविध टप्पे व प्रक्रिया, स्टेट बँक ऑफ इंडियाचे युगेश सामंत यांनी निर्यातीसाठी बँकेच्या विविध योजना, प्रा. तुषार पाटील यांनी वस्त्रोद्योग उत्पादनांसाठीच्या विविध संधी याविषयी, तसेच धुपेस्कर, उद्योग उपसंचालक इंगळे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक सुभाष गिरासे, उद्योग निरीक्षक एस.टी. लासूरकर, एस.बी. ओझरकर, एमसीईडीचे प्रकल्प अधिकारी नवीन खंडारे, मिटकॉनचे प्रकल्प अधिकारी पी.टी. महाजन यांनी या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. उपसंचालक इंगळे यांनी प्रास्ताविक केले. उद्योग निरीक्षक एन.पी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले.