धुळे : कोरोनामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थींच्या फीमध्ये सवलत द्यावी, अशी मागणी करीत युवासेनेने फी वसुलीच्या सक्तीला विरोध केला आहे.
कोरोनामुळे अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. शिवाय शाळा बंद असून, ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात सवलत मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा पालकांकडे शुल्क वसुलीसाठी तगादा लावत आहेत. त्यामुळे सक्तीने होणारी शुल्क वसुली थांबवावी, शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी, शुल्क चार टप्प्यात भरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी युवासेनेने केली आहे. याविषयी प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संकटामुळे होत्याचे नव्हते झाले. काहींच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला. या संकटात काही विद्यार्थ्यांनी आई-वडील गमावले. अनेकांच्या हाताला काम नाही. शाळा, महाविद्यालये बंद पडली आहेत. सर्व शाळांमध्ये ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जाते आहे. शाळा बंद असूनही इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण संस्था शंभर टक्के फी वसूल करत आहेत. सक्तीने सुरू असलेली शुल्क वसुली थांबवण्यात यावी. विद्यार्थी शुल्काअभावी अभ्यास व प्रवेशापासून वंचित राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू असल्याने पालकांचा खर्च वाढला आहे. अनेक पालकांना मुलांसाठी स्मार्ट फोन घ्यावे लागले. त्यामुळे आता शाळांनी शैक्षणिक शुल्कात सवलत द्यावी, सर्व इंग्रजी माध्यमांच्या शाळेचे संचालक व मुख्याध्यापकांची बैठक घ्यावी. त्याचबरोबर ज्या पालकांना टप्प्याटप्प्याने शुल्क भरायचे असेल त्यांना तशी सवलत द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी शिक्षणाचे बाजारीकरण केले आहे. शाळेतूनच पुस्तके, वह्या घ्या ,असे संदेश पाठवले जातात. तसेच काही शाळा विशिष्ट दुकानातून पुस्तके-वह्या घेण्याची सक्ती करतात. ही पिळवणूक थांबवण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख पंकज गोरे यांच्यासह पदाधिकारी व पालक उपस्थित होते.