नेर जवळील सुरत नागपूर महामार्गावरून गुजरात दहेज येथून गॅस टँकर (जीजे-१२, बीटी-३१६०) चाळीसगाव येथे जात होता. या टँकरमध्ये औद्योगिक कंपनीसाठी वापरण्यात येणारा गॅस होता. हा गॅस ज्वलनशील नव्हता. या गॅसपासून सीएनजी गॅस तयार करण्यात येतो.
रात्री उशीर झाल्याने चालकाने नेर येथील एका हॉटेलजवळ टँकर थांबवून मुक्काम केला. त्यानंतर चालक पहाटे टँकर घेऊन चाळीसगावकडे जात असताना लोढानालाजवळ टँकरमधून गॅस गळती सुरू झाली. ही माहिती समोरून येणाऱ्या एका वाहनचालकाने टँकर चालकाला दिली. त्यामुळे चालकाने टँकर थांबवून पाहिले असताना गॅस गळती सुरू झाली होती. चालकाने ही माहिती मालकाला दिली. घटनेची माहिती मिळताच नेर पोलीस दूरक्षेत्राच्या पोलिसांसह धुळे महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक हेमंत भामरे, सहायक पोलीस निरीक्षक छगन शिवदे, पोलीस कॉन्स्टेबल मनोज साठे, पोलीस नाईक विनोद सरदार, नितीन चव्हाण हे घटनास्थळी दाखल झाले. पाहणी केल्यावर फार धोका नसल्याचे समजल्यावर तत्काळ दुसरा टँकर (जीजे- ०२, झेडझेड- ५६९३) मागवून त्यात गॅस भरून घेण्यात आला. दरम्यान अनर्थ होऊ नये म्हणून वाहतूक इतरत्र मार्गाने वळविण्यात आली होती. त्यामुळे महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला नाही.
अग्निशमन दल दाखल
गॅस गळती होऊन धोका निर्माण होऊ नये म्हणून धुळे महानगरपालिकेचे अग्निशमन दलालाही पाचारण करण्यात आले. फायरमन अमोल सोनवणे, योगेश मराठे, ऑपरेटर राकेश माळी यांनी टँकर खाली होऊन मार्गस्थ लागेपर्यंत घटनास्थळी पहारा दिला.
वाहतूक वळवली...........
गॅस टँकर लिकेज झाल्याने महामार्गावर कोणताही अनर्थ घडू नये म्हणून महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलिसांनी गळती लागलेल्या टँकरचा मार्ग बंद करून बाजूच्या मार्गाने वाहतूक वळवली होती. यामुळे वाहतुकीचा अधिक खोळंबाही झाला नाही.