सुनील बैसाणे
धुळे : कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना ४ लाखांची मदत मिळणार असल्याचा मेसेज आजही सोशल मीडियावरुन व्हायरल होत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने १४ मार्च २०२० रोजी एक परिपत्रक काढून मृतांच्या वारसांना ४ लाख रुपयांचे अर्थसहाय देण्याचे जाहीर केले होते, परंतु केंद्र शासनाने त्याच दिवशी दुसरे परिपत्रक काढून पहिले परिपत्रक मागे घेत कोरोनाग्रस्तांच्या तोंडाला पाने पुसली.
केंद्र शासनाने अर्थसहाय्याचा निर्णय घेतल्यावर त्याच दिवशी नेटकऱ्यांनी जनजागृतीसाठी सोशल मीडियावरुन हा मेसेज टाकला. परंतु निर्णय मागे घेतल्याचा मेसेज आला नाही. त्यामुळे पहिला मेसेज आजही सोशल मीडियावरुन व्हायरल होत असल्याने तो बनावट ठरला आहे. परंतु मेसेज वाचून नागरिक प्रशासनाचे आणि दवाखान्यांचे उंबरठे झिझवत आहेत. प्रशासनासह नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कारण अशी कोणतीही योजना नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मृतांचे नातेवाईकच नव्हे तर खासगी रुग्णालयात उपचार घेऊन लाखो रुपये खर्च करणारे रुग्ण देखील अशा लावून बसले आहेत. त्यांनी देखील अर्ज करण्यासाठी खटाटोप केला होता, परंतु साऱ्यांच्या आशा फोल ठरल्या आहेत.
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे शेकडो अर्ज
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना ४ लाखांचे अर्थसहाय्य करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे शेकडो जण अर्ज करण्यासाठी आले. परंतु सदरचे अर्ज संबंधित रुग्णालयांच्या महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या कक्षात जमा करण्याचे सांगण्यात आले. परंतु मदत मिळणार नसल्याचे स्पष्ट होताच दोन्ही विभागांनी अर्ज स्वीकारले नाहीत. परंतु काहीजण आपत्ती व्यवस्थापनकडे बळजबरीने अर्ज जमा करुन गेले आहेत. असे ७० पेक्षा अधिक अर्ज पडून आहेत.
या अर्जांचे काय करणार?
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे आलेल्या अर्जांचे नेमके करायचे काय असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. परंतु मदतीचा मेसेज बनावट असल्याने हे अर्ज रद्दीतच पडून राहण्याची शक्यता आहे. सामान्यांना मात्र आशा लागली आहे.
अर्ज करु नका, अशी कुठलीही योजना नाही!
कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदतीची कोणतीही योजना नाही. त्यामुळे नागरिकांनी अर्ज करु नये किंवा प्रशासनाकडे तगादा लावू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.