आॅनलाइन लोकमतधुळे: येत्या सात एप्रिलपासुन धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरेदी विक्रीचे व्यवहार सुरळीतपणे सुरू होणार आहेत़ त्यासाठी आगाऊ नोंदणी करुन टोकन घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते़ शनिवारी पहिल्याच दिवशी ५७ शेतकऱ्यांनी नोंदणी करुन टोकन प्राप्त केले आहे़आपत्कालिन परिस्थितीत कृषी उत्पन्न बाजार समिती, धुळे येथील आवारात शेतमाल खरेदी- विक्रीचे व्यवहार सुरू ठेवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत. त्यानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी दररोज १५० वाहनांतील शेतमालाचीच खरेदी करावी. त्यासाठी शेतकऱ्यांनी ४ एप्रिलपासून कृषी उत्पन्न बाजार समितीकडे नोंदणी करून टोकन घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी केले आहे.शेतमाल वाहतुकीसाठी वाहनाचे आवश्यक पास संबंधित पोलिस विभाग, परिवहन कार्यालयाकडून विहितरितीने उलपलब्ध करून घ्यावेत. आगाऊ टोकनद्वारे निश्चित केलेल्या तारखेलाच शेतकºयांनी शेतमाल विक्रीसाठी आणावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे़अधिकृत टोकन शिवाय बाजार समितीच्या आवारात प्रवेश दिला जाणार नाही किंवा शेतमालाच्या खरेदी- विक्री संबंधित कामकाज करण्यात येणार नाही. बाजाराच्या आवारात केवळ शेतमाल उत्पादक, विक्रेता, परवानाधारक व्यापारी, आडते, हमाल, मापारी व त्यांचे सहाय्यक आणि बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी यांनाच प्रवेश राहील.बाजाराच्या आवारात शेतकरी, बाजार घटक आणि बाजार समितीचे अधिकारी व कर्मचाºयांनी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधक उपाययोजनानुसार मास्क घालूनच प्रवेश करणे सक्तीचे आहे.सोशल डिस्टन्सिंग व हाताची स्वच्छता करण्याबाबतच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. वरील सूचनांचे उल्लंघन करणारे व प्रशासनास सहकार्य न करणाºयांविरोधात आवश्यक प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे़
धुळे बाजार समितीत पहिल्या दिवशी ५७ जणांनी केली नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 11:54 IST